Grampanchayat Election 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित पाऊल उचलले गेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, चुकीच्या प्रभाग रचनेमुळे किंवा इतर कारणांमुळे निवडणुका रखडलेल्या ९९ ग्रामपंचायती आणि १९७ रिक्त जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता.
आज, २६ मार्च २०२५ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत असून, या प्रक्रियेमुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना आता नव्या नेतृत्वाची आशा निर्माण झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १२ मार्च रोजी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता, ज्याअंतर्गत जिल्हा ग्रामपंचायत शाखेने गेल्या १५ दिवसांत रिक्त जागांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले. १९ मार्च रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली,
तर २४ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्या. या प्रक्रियेनंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत आहे, ज्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे. २०२४ मध्ये ८४ ग्रामपंचायतींची मुदत संपली होती आणि १५५ सदस्यांच्या जागा पोटनिवडणुकीसाठी रिक्त झाल्या होत्या.
तर २०२५ मध्ये श्रीगोंदा (६), संगमनेर (२), कर्जत (२), पारनेर (२) आणि अकोले (३) या तालुक्यांतील १५ ग्रामपंचायतींची मुदत संपली, तसेच ४२ जागा रिक्त झाल्या. या सर्वांसाठी मतदार यादी तयार झाल्याने निवडणूक प्रक्रिया आता गती घेणार आहे.
या निवडणुकीच्या तयारीत काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सात ग्रामपंचायतींच्या सात जागांचे आरक्षण सुधारित करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ, शिबलापुर, वडगाव पान, नगर तालुक्यातील हमीदपुर, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, पाथर्डी तालुक्यातील भिलवडे आणि शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथील प्रत्येकी एका ओबीसी जागेचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्यात आला आहे.
हे बदल प्रभाग रचनेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. या सुधारणांमुळे मतदारांना आपले प्रतिनिधी निवडण्याची संधी योग्य पद्धतीने मिळेल, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे प्रलंबित होत्या. काही ठिकाणी चुकीची प्रभाग रचना, तर काही ठिकाणी बहिष्कार यासारख्या अडचणींमुळे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.
आता मतदार याद्या अद्ययावत झाल्याने आणि प्रभाग रचना अंतिम झाल्याने राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकते. नव्या वर्षात या निवडणुका होऊन ग्रामपंचायतींना नवे नेतृत्व मिळेल,
ज्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांमध्येही या निवडणुकीबाबत उत्साह दिसून येत असून, नव्या नेतृत्वाकडून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.