दुष्काळी मातीतून झिरपणार आता आशेचं पाणी… साकळाईचं स्वप्न आता सत्यात ! विखे पाटील कुटुंबाचा ‘जल’ विजय !

गेल्या तीन दशकांपासून अनेकांची स्वप्न ठरलेली साकळाई उपसा सिंचन योजना अखेर मार्गी लागली आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेली ही कल्पना, अनेक निवडणुकींचं केंद्रबिंदू ठरली होती. आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने या योजनेला अखेर मंजुरी मिळाली असून, घोड धरणाच्या फेर जल नियोजनामुळे सुमारे १२,००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नगर व श्रीगोंदा तालुक्यांतील ३० हून अधिक गावांसाठी ही योजना म्हणजे दुष्काळमुक्तीचा नवा अध्याय ठरणार आहे.

Updated on -

Ahilyanagar Report : साकळाई योजना हा शब्द तुम्ही-आम्ही गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तर आपले पालक ३० वर्षांपासून ऐकत आलेत. या शब्दांवर कित्येक निवडणुका लढल्या गेल्या. साकळाईच्या आश्वासनांवर कित्येकांनी सत्ताही भोगली तर कित्येकांना सत्तेतून पायउतारही व्हावे लागले. ही योजना सर्वप्रथम स्व. बाळासाहेब विखेंनी मांडली, असं सांगितलं जातं. नगर दक्षिणेचा भाग पाणीदार करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, असं स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी कित्येकदा सांगितलं होतं. गंमत म्हणजे, आजोबांनी मांडलेल्या कल्पनेवर नातवाचा लोकसभेला विजयही झाला आणि पराभवही झाला. आता ज्यांचा पराभव झाला त्यांच्याच वडीलांनी हा प्रश्न सोडवलाय. म्हणजेच विखेंना पराभव दाखवणारी साकळाई योजना, आता विखेंमुळेच मार्गी लागली आहे. याच विषयाची आज आपण माहिती घेऊयात…

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनास जलसंपदा विभागाने शुक्रवारी (दि.21 मार्च) मंजुरी दिली. या फेर जल नियोजनामुळे प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. म्हणजेच गेल्या तीस वर्षांपासूनचा प्रश्न आता मार्गी लागल्यात जमा झाला.

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनी, याच प्रश्नावर गेल्या ३०-४० वर्षांपासून राजकारण केले. बहुतेक सगळ्यांनीच या प्रश्नासाठी प्रयत्न केले. काहींनी फक्त राजकारण केले, हा भाग वेगळा. मात्र या दोन्ही तालुक्यातील सुमारे बारा हजार हेक्टर जमीन या योजनेमुळे, ओलिताखाली येणार होती. गेल्या 30-40 वर्षांपासून साकळाई योजनेचा प्रस्ताव धूळ खात पडला होता. साकळाई योजना माग लागावी यासाठी, साकळाई कृती समितीनेही लढा उभारण्यात आला. दोन पिढ्यांनी यासाठी आंदोलने केली.

शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र प्रत्येक वेळी पुण्याच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे हा प्रश्न अडकत राहिला. योजना मार्गी लागेल असे दिलायला लागले की, सरकार बदलायचे. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न व्हायचे. मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकड सोपविण्यात आले. कृती समितीच्यावतीने वारंवार साकळाई योजनेचा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनीही हा प्रश्न लावून धरला आणि अखेर तो सुटला.

गंमत म्हणजे डाँ. सुजय विखे यांनी २०१९ मध्ये हाच प्रश्न मार्गी लावण्याच्या शब्दावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र २०२४ मध्ये याच प्रश्नामुळे त्यांना पराभव पहावा लागला. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगर लोकसभा मतदासंघातील भाजपाचे तत्कालिन उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. परंतु, त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले व साकळाई योजनेचा प्रश्न मागे पडला.

त्यानंतर पुन्हा युतेीचे सरकार आल्यानंतर युती सरकारच्या काळात माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई योजनेसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध असल्याचे दाखवून दिले. साकळाई योजनेसाठी मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. सरकारमध्ये जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर पडताच मंत्री विखे पाटील यांनी हा प्रश्न तडीस नेला.

या योजनेमुळे नगर व श्रीगोंदा तालुक्यातील बारा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. चिखली, कोरेगाव, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी, वाळकी, शिराढोण, हिवरे झरे, बाबुर्डी बेंद, दहिगाव, साकत, वाटेफळ, देऊळगाव सिद्धी, तांदळी, वडगाव, रुईछत्तसी, आंबिलवाडी, गुणवडी, गुंडेगाव, राळेगण, मांडवगण, मठपिंप्री, हातवळण, खांडगाव, महांडूळवाडी, कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोतुळ, बांगर्डा, कामठी, खांडगाव अशी सुमारे ३३ ते ४० गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. तब्बल 12 हजार हेक्टर क्षेत्र 1.8 टीएमसी पाण्यामुळे ओलिताखाली येणार आहे.

स्वप्न दाखवलं आजोबांनी, पूर्ण केलं वडिलांनी आणि शब्द पूर्ण झाला नातवाचा… असंच काहीस याबाबत होणार आहे. एक मात्र खरं की, आता विखे विरोधकांना या प्रश्नाचं भांडवल करता येणार नाही. नगर दक्षिण लोकसभेसह दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीला यामुळे फायदा होणार आहे. मित्रांनो, साकळाई प्रश्न मार्गी लावल्याचा विखे कुटुंबाला राजकीय फायदा होईल का, तुम्हाला काय वाटतं. तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

हे पण वाचा : श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा भूकंप ! ‘भाऊ’ एकत्र? की ‘वाद’ कायम ? नवा ट्विस्ट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe