पारनेर – “दुष्काळी तालुक्यात जन्म घेतला म्हणून आम्ही काय पाप केलं का?” असा सवाल आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत विचारला. पारनेर तालुक्यावर निसर्गाची कायमच अवकृपा राहिली आहे. दुष्काळी तालुका म्हणून आम्हाला ओळखलं जातं.
गेल्या पन्नास वर्षांपासून इथले शेतकरी शेतीसाठी पाण्याचा संघर्ष करत आहेत. पण दुसरीकडे सांगली, सातारा, सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपये खर्चून उपसा जलसिंचन योजना राबवल्या जातात. आमच्याकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होतंय, असं दाते यांनी ठणकावून सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “येत्या पाच वर्षांत पारनेरच्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जाणार आहेत की नाही?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलताना त्यांनी हे मुद्दे मांडले.
मराठवाड्यात १५ टक्क्यांपेक्षा कमी शेतजमीन सिंचनाखाली असल्याने तिथे विशेष योजना राबवल्या जातात आणि त्यावर चर्चाही होते. पण पारनेर मतदारसंघात तर ५ टक्के शेतजमिनीला देखील पाणी मिळत नाही.
मराठवाड्याला पाणी द्यायचं म्हणून गोदावरी खोऱ्यात येणाऱ्या आमच्या भागात एक इंच पाणी अडवायलाही परवानगी नाही. हा पारनेर तालुक्यावरचा अन्याय आहे, असं दाते यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, “इथली परिस्थिती दुष्काळी आणि प्रतिकूल असल्याने आमच्या तरुणांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे इथे शिक्षणाचं प्रमाण खूप आहे. संपूर्ण राज्याला शिक्षक पुरवणारा तालुका म्हणून पारनेरची ओळख आहे.”
पारनेरच्या उत्तरेला वाहणाऱ्या मुळा नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतोय. टाकळी ढोकेश्वर परिसरात वाळू तस्करांचा सुळसुळाट झालाय. यामुळे गुन्हेगारी वाढली आहे.
अमंली पदार्थ आणि मादक द्रव्यांची खुलेआम विक्री होतेय. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टाकळी ढोकेश्वरला पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेलं पोलिस ठाणं तातडीने सुरू करावं, अशी मागणीही आमदार दाते यांनी जोरदारपणे मांडली.