सव्वाशे वर्षांपूर्वीच्या साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांचे घेता येणार दर्शन, १० ते २६ एप्रिलपर्यंत साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन!

Published on -

शिर्डी- शिर्डी हे साईबाबांचं पवित्र तीर्थक्षेत्र देशभरातील करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात.

पण काहींना ही संधी मिळत नाही. अशा भाविकांच्या मागणीनुसार, साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्याची विनंती शिर्डी साईबाबा संस्थानला करण्यात आली होती.

त्याला प्रतिसाद देत संस्थानने यंदा १० एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत हा खास सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामुळे साईभक्तांना बाबांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.

हा सोहळा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही आयोजित होणार आहे. या तिन्ही राज्यांमधून भाविकांची मोठी मागणी होती, त्यामुळे साईंच्या पादुका तिथल्या भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

साईबाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसंच भाविकांना या पवित्र पादुकांचं दर्शन मिळावं, हा या मागचा उद्देश आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या या मूळ चर्म पादुका शिर्डीच्या बाहेर प्रथमच नेण्यात येत आहेत. यासाठी संस्थानने काही नियमही तयार केले आहेत, जेणेकरून दर्शन व्यवस्थित आणि सुरक्षितपणे पार पडेल.

या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पादुका जिथे दर्शनासाठी ठेवल्या जातील, तिथेच त्या राहणार. कोणत्याही भाविकाच्या घरी त्या नेण्यास परवानगी नाही.

सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थेसाठी साई संस्थानचे अधिकारी, सुरक्षारक्षक आणि मंदिरातील पुजारी असे एकूण २० कर्मचारी सहभागी असतील. शिर्डीत साई मंदिरात जे रोजचे कार्यक्रम होतात, तसेच कार्यक्रम या सोहळ्यादरम्यानही ठिकठिकाणी होतील. भाविकांना साईंच्या जवळ जाण्याचा अनुभव मिळावा, यासाठी ही काळजी घेतली जात आहे.

हा निर्णय साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नेमलेल्या या समितीत अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश (संस्थानचे अध्यक्ष), जिल्हाधिकारी आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.

या तिघांनी मिळून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत साईंच्या पादुका शिर्डीबाहेर नेण्याला हिरवा कंदील दिला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं की, हा सोहळा भाविकांच्या श्रद्धेला साजेसा होईल, याची खबरदारी घेतली आहे.

या सोहळ्याचा तपशील असा आहे – १० ते १३ एप्रिल या काळात महाराष्ट्रातील सांगली शहर आणि पेठ वडगाव येथे पादुका दर्शनासाठी ठेवल्या जातील. त्यानंतर १४ ते १८ एप्रिलपर्यंत कर्नाटकातील दावनगेरे आणि मल्लेश्वरम येथे सहा दिवस भाविकांना दर्शनाची संधी मिळेल.

१९ एप्रिलच्या सायंकाळी पादुका तामिळनाडूकडे रवाना होतील आणि १९ ते २६ एप्रिल या काळात सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापूरी या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असतील. २६ एप्रिलच्या संध्याकाळी धर्मापूरी येथून पादुका पुन्हा शिर्डीकडे परत येतील. हा सोहळा साईभक्तांसाठी एक अनमोल अनुभव ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe