दक्षिण मुंबई थेट पालघर सोबत जोडली जाणार! 87 हजार 427 कोटी रुपयांच्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाला एमएमआरडीएची मंजुरी

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी हा मोठा चिंतेचा विषय आहे. दरम्यान शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी शहरात विविध रस्ते विकासाचे प्रकल्प सुरु आहेत. अशातच आता शहरात आणखी एक नव्या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई थेट पालघर सोबत जोडली जाणार आहे.

Published on -

Mumbai News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक अक्षरशा हैराण झाले असे. अशातच आता दक्षिण मुंबई थेट पालघर सोबत जोडली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. दक्षिण मुंबई थेट पालघर जिल्ह्याला जोडली जाणार असून यासाठी सागरी सेतू उभारण्याचा निर्णय झाला आहे.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच या प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पासाठी 87,427 कोटी रुपये खर्चास मान्यता दिली आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार, हा सागरी मार्ग दोन टप्प्यात उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार जोड रस्ता आणि सागरी सेतू तयार केला जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर दरम्यानचा सागरी मार्ग विकसित केला जाईल.

एकूण 55.42 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे सोबत विरार येथे जोडला जाणार आहे, त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याने आता या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सागरी मार्गामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या एका तासात शक्य होणार असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे. यामुळे मुंबईकरांना जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. यापूर्वी मरिन ड्राइव्ह ते वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक कार्यान्वित झाला आहे. तसेच, सध्या वांद्रे- वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू असून, त्यानंतर वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड सुद्धा विकसित केला जात आहे. या सगळ्यामुळे दक्षिण मुंबई ते पालघर दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात वेगवान आणि सुलभ होणार आहे.

यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघातांची संख्या सुद्धा कमी होणार आहे. या प्रकल्पात तीन मुख्य कनेक्टर तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये विरार कनेक्टर (18.95 किलोमीटर), वसई कनेक्टर (2.5 किलोमीटर) आणि उत्तन कनेक्टर (10 किलोमीटर) यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एमएमआरडीए जपानमधील ‘जायका’ या वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यावर, केंद्र सरकारकडे परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. मग खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी सागरी मार्गाचे काम कधीपासून सुरू होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News