करंजी घाटातील गर्भगिरी डोंगराला लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप, शेकडो झाडे जळून खाक, अनेक पशु-पक्षांचा तडफडून मृत्यू

Published on -

करंजी (पाथर्डी): करंजी घाटाजवळील गर्भगिरी डोंगराला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली, तर जंगलातील अनेक पशु-पक्षांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मध्यरात्री दीडच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करंजी घाटाजवळील घोरदरा परिसरात ही आग लागली. काही वेळातच आगीने शेकडो एकर जंगलाचा विळखा घेतला. आग इतकी भयानक होती की १० किलोमीटर अंतरावरूनही धूर आणि आगीचे लोळ दिसत होते.

नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली असली तरी वन कर्मचारी घटनास्थळी उशिराने पोहोचले, त्यामुळे आगीने मोठे नुकसान केले.या भयानक आगीच्या बातमीने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी तातडीने मदतीसाठी धावून आले.

मांडवा येथील आनंदवन प्रकल्पाचे संदीप राठोड, निसर्गमित्र प्रा. अमित गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण चळवळीचे कार्यकर्ते सुनील मरकड, प्रा. सूर्यकांत काळोखे, गणेश कांबळे, चंद्रकांत उदागे, संतराम साबळे, सचिन चव्हाण, विजय बर्डे, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे विवेक मोरे, रणजीत अकोलकर, शुभम मुटकुळे, निखिल दुधाणे यांसह शेकडो तरुण आणि शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी जीवाची बाजी लावली.

शेतकरी आणि स्थानिक तरुणांनी लिंबाच्या झाडाच्या फांद्या, भिजवलेले गोणपाट यांच्या मदतीने तब्बल पाच तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रात्री एक ते दीडच्या दरम्यान आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले.

या आगीत वनविभागाने लाखो रुपये खर्चून लावलेली झाडे जळून खाक झाली. जंगलातील अनेक पशु-पक्षी जखमी झाले, काही तडफडून मृत्युमुखी पडले. जिल्ह्यात एकूण १७,०४८ चौ. कि.मी. क्षेत्र आहे, त्यातील १,४२२.७७ चौ. कि.मी. हे वनक्षेत्र आहे, आणि त्यातील काही भाग जळून खाक झाला आहे. वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी असलेल्या ४३३.१६ चौ. कि.मी. क्षेत्रालाही धोका निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर करंजी पोलिस ठाण्यात आगीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाने तत्काळ पाहणी आणि पंचनामा सुरू केला असून, नुकसानीचा अंदाज लवकरच स्पष्ट होईल, असे वनपाल ए. एम. शर्माळे (तिसगाव) यांनी सांगितले.

या भीषण आगीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून, जंगल आणि वन्यजीव संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News