केडगाव : सध्या सणासुदीचा हंगाम असल्यामुळे फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुलाब, मोगरा, झेंडू आणि शेवंती यासारख्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
अहिल्यानगर येथे गुलाब २०० रुपये किलो, तर मोगरा तब्बल ८०० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या हंगामात चांगला लाभ मिळत आहे.

गणपतीच्या दर्शनासाठी माळीवाडा येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. हे भाविक देवपूजेसाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करतात. मात्र, उन्हाळा सुरू होताच फुलांची आवक घटते आणि किमतीत वाढ होते. विशेषतः लग्नसराई असल्यामुळे गुलाबाच्या हारांना मोठी मागणी आहे.
सध्या पुष्पगुच्छ आणि हारांची मागणी तब्बल ५० टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये गुलाब आणि मोगऱ्याच्या फुलांना जास्त पसंती दिली जात आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथून फुले मागवली जात आहेत. पुढील दोन महिने ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता असल्याचे फुलव्यावसायिक सांगत आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने आणि पाण्याची टंचाई असल्याने नगर बाजार समितीत फुलांची आवक घटली आहे. गुलाब, झेंडू, शेवंती, गुलछडी, गलांडा, अस्टर आणि बिजली या फुलांची मर्यादित प्रमाणात आवक सुरू आहे.
“गेल्या दहा वर्षांपासून फुलशेती करीत आहे. यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन एकरात फुलशेती केली असून, चांगला उत्पादन निघत आहे.”
मामदेव बेरड, फूल उत्पादक शेतकरी
“सध्या लग्नसराईसाठी बुके आणि हारांची मागणी वाढली आहे. १५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत बुक्के बाजारात उपलब्ध आहेत. वधू-वरांसाठीचे हार २ हजार रुपयांपासून पुढे विकले जात आहेत. विशेषतः मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचे हार महाग झाले आहेत.”
— तुषार मेहेत्रे, फूल विक्रेते
सध्या सणासुदीचा हंगाम आणि उन्हामुळे फुलांची आवक कमी झाली असली तरी वाढलेल्या किमतीमुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होत आहे. पुढील काही दिवस ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघेही समाधानात आहेत.