आढळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अजनूज (ता. श्रीगोंदा) येथील यमुनाबाई नानासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही निराशाच पदरी पडली आहे.
वन विभागाने पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालात वन्य प्राण्याच्या हल्ल्याची खात्री पटत नसल्याचे कारण देत नुकसानभरपाई नाकारली आहे. या निर्णयामुळे आपल्या आईला गमावलेल्या शिंदे कुटुंबीयांची वेदना अधिकच तीव्र झाली आहे.

१ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे यमुनाबाई शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाला तत्काळ कळवण्यात आले. यमुनाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. नगर जिल्हा रुग्णालय आणि नंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही त्यांनी नुकसानभरपाईसाठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. आवश्यक कागदपत्रे आणि कागदी सोपस्कार पूर्ण करूनही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.
नुकसानभरपाई न मिळाल्याने शिंदे कुटुंबाने श्रीगोंदा जनपरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवाल मिळवण्यासाठी वेळ देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, दीड महिना उलटल्यानंतरही निर्णय न झाल्याने कुटुंबाने पुन्हा सात दिवस धरणे आंदोलन केले.
यानंतर वन विभागाने श्रीगोंदा पोलिसांकडून आवश्यक कागदपत्रे मिळवून अहिल्यानगर उपवनसंरक्षक कार्यालयाकडे अहवाल पाठवला. पण तत्कालीन वनपालांच्या पंचनाम्यात आणि शवविच्छेदन अहवालात वन्य प्राण्याच्या हल्ल्याची खात्री पटत नसल्याचे कारण देत नुकसानभरपाई नाकारली.
वन विभागाच्या भूमिकेमुळे यमुनाबाई शिंदे यांच्या कुटुंबीयांना आपल्या आईच्या मृत्यूचे कारणच समजेनासे झाले आहे. विशेष म्हणजे, श्रीगोंदा पोलिसांनी यमुनाबाईंच्या मृत्यूचे कारण बिबट्याचा हल्ला असे नमूद करून तपास बंद केला आहे. मात्र, वन विभाग मात्र वेगळेच म्हणत आहे, त्यामुळे एकीकडे आईचा मृत्यू, तर दुसरीकडे भरपाई न मिळाल्याने कुटुंबीयांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
“ससून रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आम्हाला फटका बसला. आता वन विभागाच्या निर्णयामुळे आमच्या आईच्या मृत्यूचे कारणही आम्हाला समजत नाही!”
– महादेव शिंदे, अजनूज, ता. श्रीगोंदा
या संपूर्ण प्रकरणावर अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.”वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा असतो. या प्रकरणात वन्य प्राण्याचा हल्ला झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने नुकसानभरपाई नाकारली आहे.”
यमुनाबाई शिंदे यांच्या कुटुंबीयांनी दीड वर्ष लढा दिला, पण अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. आई गमावल्याचा मानसिक आघात पचवतानाच, भरपाईसाठी करावा लागणारा संघर्ष त्यांना आणखीच वेदना करत आहे. आता पुढे काय होणार? वन विभागाचा निर्णय अंतिम राहणार की कुटुंब पुन्हा लढा उभारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.