अहिल्यानगर- भाजपने आगामी संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष, उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष यांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे. १५ ते २५ एप्रिल दरम्यान या नियुक्त्या करण्यात येणार असून, भाजपने या निवड प्रक्रियेसाठी विशेष निकष ठरवले आहेत.
भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी स्पष्ट केलं की, जिल्हाध्यक्षपदासाठी फक्त पक्षनिष्ठा पुरेशी नसून, विचारांवर चालणारा, प्रामाणिक, आणि पक्षासाठी वेळ व पैसा खर्च करणारा नेता असणे आवश्यक आहे. म्हणजेच पक्षासाठी खऱ्या अर्थाने झटणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी मिळणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
ही माहिती विजय चौधरी यांनी अहिल्यानगर शहरात झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी रवींद्र अनासपुरे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आणि जिल्ह्याचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सदस्य नोंदणी मोहीम
६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिन असल्याने त्यानिमित्ताने “संघटन पर्व” सुरू करण्यात आले असून, त्याअंतर्गत संपूर्ण देशात १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी २१ लाख ४६ हजार ३०४ सदस्यांचे उद्दिष्ट दिले गेले आहे. या प्रयत्नात पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी ?
ज्यांच्या कार्यकाळाला दीड ते तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा जिल्हाध्यक्षांसाठी ही निवड प्रक्रिया लागू होणार आहे. त्यांना पुन्हा संधी द्यायची की नव्या चेहऱ्यांना पुढे आणायचं, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत विजय चौधरी यांनी असंही स्पष्ट केलं की, भाजपच्या यशामागे कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत आणि “कोणताही निष्ठावंत कार्यकर्ता पक्षावर नाराज नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला.
पत्रकार आहेत का ?
या पत्रकार परिषदेत एक गमतीशीर क्षणही घडला. भाषणाच्या वेळी चौधरी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विचारले, “पत्रकार आहेत का?” यावर उपस्थितांनी “एकच पत्रकार आहे” असं सांगितल्यावर ते थोडंसं विषयांतर करत दुसऱ्या मुद्यावर आले.
पक्षासाठी वेळ, पैसा…
भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडींमध्ये केवळ पदांवर काम करणं नव्हे, तर पक्षासाठी वेळ, पैसा आणि समर्पणाने योगदान देणं हे प्रमुख निकष ठरणार आहेत. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी निवडीत कार्यकर्त्यांच्या कामगिरीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.