Ahilyanagar News : शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी खान टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मोक्का लावण्याची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्या अज्जू खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. काळे यांनी म्हटले आहे की, मूळ समस्येला बगल देऊन दुतोंडी भूमिका घेत दोन समाजांना एकमेकां विरुद्ध उभे करत स्वतःची वैयक्तिक राजकीय पोळी स्वयंघोषित कार्यसम्राट भाजून घेत आहेत. खान टोळीचा आका कोण आहे याची पुराव्यानिशी पोलखोल शिवसेनेने केली आहे.
बाजारपेठ उध्वस्त करण्याच षडयंत्र राबविल जात आहे. जगाला ताप गॅंगमुळे व्यापाऱ्यांचा धंदा कायमचा बुडेल. व्यापारी रस्त्यावर येईल. त्यामुळे व्यापारी बांधवांनो वेळीच सावध व्हा, असे आवाहन काळे यांनी केले आहे. हिंदुत्व हा ठाकरे शिवसेना आणि या शहराचा श्वास आहे. ढोंगी नेतृत्वाकडून या शहरात तो दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो दाबू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्ही चारी मुंड्या चित करू असा इशारा, काळे यांनी दिला आहे.

बाजारपेठेतील मारहाण प्रकरणावरून उठलेला राजकीय धुरळा काही शांता व्हायला तयार नाही. या व्हिडिओमध्ये खान काही लोकांना म्हणतो आहे की, “मै तो बोलूंगा शहर लोकप्रतिनिधी काईच काम करो. आज बाजार के अंदर उनके वजेसे ही धंदे लग रहे है.” यावरून निशाणा साधत काळे यांनी आरोप केला आहे की, बाजारपेठेतील अतिक्रमणधारकांचे आका हे
बेगडी हिंदुत्ववादी शहर लोकप्रतिनिधीच आहेत. मी कधीही बिनबुडाचे आरोप कोणावर करत नाही. मी जे बोलतो त्याचे पुरावे समाजासमोर मांडतो. दूध का दूध, पानी का पानी झाले आहे. त्यामुळे अहिल्यानगर मधील तमाम हिंदूंनी झुल पांघरलेल्या लांडग्या पासून वेळीच सावध व्हावे.
षडयंत्रा मागे मोठे अर्थकारण
स्वयंघोषित कार्यसम्राट आणि त्यांच्या काही अवैधरित्या काम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिक भागीदारांनी राजकीय सत्तेचा गैरवापर आणि दहशतीच्या माध्यमातून उपनगरांमधील मोक्याच्या जागांवर ताबेमारी केली आहे. त्या ठिकाणी मोठमोठे मॉल उभारले जात आहेत. मॉलमधील व्यावसायिक गाळ्यांना व्यापारी गिऱ्हाईक यांना मिळायला तयार नाहीत. जोपर्यंत शहराची पारंपरिक मुख्य बाजारपेठ उध्वस्त होत नाही तोपर्यंत या टोळीच्या गाळ्यांना गिऱ्हाईक मिळायला तयार नाही. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहक कसे येणार नाहीत यासाठी सातत्याने वेगवेगळी कटकारस्थाने राबवली जात असल्याचा आरोप काळेंनी केला आहे.
मनपा प्रशासनाचा गैरवापर
काळे पुढे म्हणाले, बाजारपेठेतील वाद चिघळविण्यासाठी मनपा प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे. “बाजारपेठेत तणाव” या मथळ्याखाली वारंवार मीडिया, सोशल मीडियातून बातम्या पेरल्या जात आहेत. यामुळे शहरातील उपनगरे, ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन ग्राहक बाजारपेठेमध्ये खरेदी करिता येण्यास घाबरत आहे. पंचवीस टक्केच धंदा आता उरला असल्याची व्यथा व्यापारी आमच्याकडे खाजगीत व्यक्त करत आहेत. मनपा कारवाईचा केवळ फार्स केला जातो. सरकार असून साधी पोलीस चौकी बाजारपेठेत हे उभारू शकत नाहीत. व्यापारी आणि ग्राहकांसाठी इतक्या वर्षात एक मुतरी सुद्धा हे बांधू शकले नाहीत. अयोग्य लोकप्रतिनिधी निवडण्याच्या चुकीचा गंभीर दूरगामी परिणाम शहरावर होत आहे.
श्रीराम भक्तांना खंडणीखोर म्हणणारे…
काळे म्हणाले, बेगडी हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्या लोकप्रतिनिधीचे भाडोत्री, लाभार्थी, तथाकथित स्वयंघोषित हिंदुत्ववादी हे श्रीराम भक्तांना खंडणीखोर म्हणत आहेत. सण, उत्सव हे समाजाच्या सहभाग, योगदानातून उभे राहत असतात. त्यासाठी वेळ, सेवा, दान, आर्थिक सहयोग देणे हे पुण्य कर्म आहे. त्याचे शहर शिवसेना स्वागत करते. पण आकाचा वरदहस्त असणारी एक विशिष्ट टोळी भगवे पंचे घालून व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करत असून तक्रार केल्यास बघून घेऊ अशा धमक्या देत आहेत. दहशतीमुळे कोणीही तक्रार द्यायला पुढे यायला तयार नाही. त्यामुळे अशांचे फावत आहे. व्यापाऱ्यांनी अशा ढोंगी वसुली बहाद्दरांना भीक घालू नये. हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांची ठाकरे शिवसेना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे किरण काळे यांनी जाहीर केले आहे.