अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध, आंदोलनाचा दिला इशारा

निमगाव खलू येथे दालमिया कंपनीचा सिमेंट प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. प्रदूषणामुळे शेती, जनावरांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करत ग्रामपंचायतींनी विरोधाचे ठराव मंजूर केले आहेत.

Published on -

अहिल्यानगर- घोड आणि भीमा नदीच्या बागायती पट्ट्यातील निमगाव खलू परिसरात प्रस्तावित दालमिया (भारत) ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे शेती, जनावरांचे आरोग्य आणि पर्यावरणाला गंभीर धोका बसेल, अशी भीती व्यक्त करत १० ते १५ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

शेतीला धोका

प्रकल्प क्षेत्रातील निमगाव खलू, कौठा, गार, अजनूज, काष्टी, शिपलकरवाडी, दत्तवाडी, आर्वी, अनगरे ही गावे बागायती असून, येथे ऊस, कांदा, मका, कपाशी यांसारखी बारमाही पिके घेतली जातात. शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती व दुग्धव्यवसाय आहे. सिमेंट कारखान्यामुळे प्रदूषण होऊन जमीन नापीक होईल, जनावरांना आजार होतील आणि दुग्धउत्पादनावरही परिणाम होईल, अशी चिंता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्यावर परिणाम

हवेतील धूळ, धूर यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनविकार, त्वचारोग, डोळ्यांचे त्रास, तसेच दीर्घकालीन आरोग्यविकार होण्याचा धोका आहे. जनावरांसह वन्यजीवांचाही समावेश असलेल्या स्थानिक जैवविविधतेवरही याचा घातक परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतींचा विरोधाचा ठराव

गार ग्रामपंचायतसह अनेक गावांनी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाला विरोध करणारे ठराव केले आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिमेंट प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील हे खरे असले, तरी त्याची किंमत हजारो शेतकरी व त्यांच्या कुटुंबांच्या जगण्यावर उठेल.

पुणे जिल्ह्यातील कानगाव येथे अशाच प्रकारचा सिमेंट कारखाना स्थापन करण्यात आला होता. त्याचा विपरीत परिणाम होऊन शेती व पर्यावरणाचा ऱ्हास झाला आणि अखेर तो प्रकल्प बंद करण्यात आला. तसाच अनुभव पुन्हा इथे नको, अशी स्पष्ट भूमिका शेतकरी आणि ग्रामस्थांनी घेतली आहे.

आंदोलनाचा इशारा

परिसरातील ग्रामपंचायती येत्या काही दिवसांत ग्रामसभा घेऊन विरोधाचे अधिकृत ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत. “सिमेंट कंपनीमुळे २०० लोकांना रोजगार मिळेल, पण दोन हजार शेतकरी बेरोजगार होतील,” असे सांगत अनिल मगर, शाहू शिपलकर, योगेश भोईटे आदी शेतकऱ्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस म्हणाले की, “हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या बागायती पट्ट्यात सिमेंट प्रकल्प म्हणजे पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवर आक्रमण आहे.” या आंदोलनामध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्र येत आहेत, ही बाब लक्षणीय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News