नागपूर- नागपूरमधील एका घटनेने पाळीव प्राणी मालकांच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एका डॉक्टरकडील गोल्डन रॉटव्हिलर प्रजातीच्या कुत्र्याने शेजाऱ्यावर हल्ला करत त्यांना चावा घेतल्याने हा प्रकार चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही त्या कुत्र्याने हल्ला केल्याचा आरोप आहे.
घटनेचा तपशील
२ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता अनिल चौधरी (६५) हे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. पंडित यांच्या गोल्डन रॉटव्हिलर कुत्र्याला त्यांचा नोकर फिरवण्यासाठी घेऊन आला होता. अचानक रॉटव्हिलरने चौधरी यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. चौधरी यांनी हस्तक्षेप करताच त्या कुत्र्याने त्यांनाही चावा घेतला. त्यातून ते जखमी झाले.

या आधीही घडला होता प्रकार
या कुत्र्याचा त्रास चौधरी दाम्पत्याला नवीन नाही. जून २०२४ मध्येही कल्पना चौधरी यांना तोच कुत्रा चावल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळीही डॉ. पंडित यांच्या पत्नीला योग्य उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र कुत्र्याचा आक्रमक स्वभाव तसाच राहिला. तो सातत्याने परिसरातील लोकांवर भुंकतो आणि धावून जातो, असा स्थानिकांचा आरोप आहे.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर कल्पना चौधरी यांनी लेखी तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे डॉ. पंडित यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी अशा घटनांमध्ये तक्रारी टाळल्या जात होत्या किंवा केवळ नुकसानभरपाईवर तडजोड केली जात होती.
कायदा काय सांगतो?
भारतीय दंड विधानाच्या कलम 289 अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पाळीव प्राण्याच्या देखरेखीत निष्काळजीपणा दाखवला आणि त्यामुळे इतरांना इजा झाली, तर संबंधित मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. या कायद्याचे उल्लंघन गंभीर स्वरूपाचे मानले जाते आणि दंड किंवा कारावासाची तरतूद आहे.
पाळीव प्राणी मालकांनी लक्ष द्याव्या अशा काही गोष्टी
आक्रमक प्रजातीच्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी मुझल (मुखपट्टी) लावणे बंधनकारक आहे.
कुत्र्यांना फिरवताना त्यांना पूर्णपणे नियंत्रित ठेवावे. कुत्र्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे आणि वेळोवेळी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शेजाऱ्यांनी दिलेले तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
पाळीव प्राणी हा कौटुंबिक सदस्य असतो, पण त्याच्या वागणुकीमुळे इतर लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी पूर्णतः मालकावर असते. नागपूरसारख्या घटनेमुळे हे स्पष्ट होते की, पाळीव प्राणी बाळगणे ही केवळ हौस नसून, एक मोठी जबाबदारी आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक मालकाने सजग आणि संवेदनशील असणे गरजेचे आहे.