अहिल्यानगर- जिल्ह्यात कापूस खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू होऊन काही महिने झाले असून सुरुवातीला कापसाला ६९०० ते ७१०० रुपये दर मिळत होते. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने खरेदी सुरु केल्यानंतर दर ७४०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला. काहींनी मात्र दर वाढतील या अपेक्षेने साठवून ठेवला.
सीसीआयची खरेदी थांबली
१२ मार्चनंतर सीसीआयने कापूस खरेदी थांबवली. त्यानंतर बाजारात काहीसा ठप्पपणा होता. पण मागील आठवड्यापासून दरात तेजी आली आहे. सध्या कापसाचे दर ७६०० ते ७८०० रुपयांपर्यंत पोहोचले असून काही व्यापार्यांचा अंदाज आहे की ते ८ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचतील.

गंमत म्हणजे जेव्हा भाव वाढले, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला होता. त्यामुळे आता दर वाढूनही विकायला काही उरलेलं नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना “हे तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतंय” असं म्हणावं लागतं.
सरकी व गठाणीच्या दरात वाढ
सध्या सरकीचे दर ३४०० ते ४२०० रुपयांपर्यंत गेले असून, दर्जेदार गठाणीचा भाव तब्बल ५५ हजार रुपये आहे. त्यामुळेही कापसाच्या दराला चालना मिळाली आहे.
पाऊस व किडीचा फटका
चालू वर्षी खरीप हंगामात अनेक भागांत अतिवृष्टी व बोंडअळीसारख्या कीड प्रादुर्भावाने उत्पन्न घटले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला. उत्पादनही कमी झाले आणि भावही समाधानकारक नाहीत.
शेतकरी म्हणत आहेत की हंगाम जवळपास संपत आला, तरी दर वाढत आहेत. साठवलेला कापूस असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल, पण विकून टाकलेल्यांना मात्र पश्चात्तापाची वेळ आली आहे.
भाव ८ हजारांवर जाणार
व्यापारी आणि काही मोठे शेतकरी असा अंदाज व्यक्त करत आहेत की, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीमुळे आणि नव्या हंगामाला अजून वेळ असल्यामुळे, दर ८ हजारांपेक्षा अधिकही जाऊ शकतात.
मेहनत करून पिकवलेला कापूस गरजेमुळे कमी भावात विकावा लागला आणि आता भाव वाढले, हे खरंच जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे.” – राम खेतमाळीस, शेतकरी, श्रीगोंदा