जामखेड- जे घामाने फुलतं, त्यालाच आज मोल मिळत नाही ही परिस्थिती सध्या जामखेड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. उन्हातान्हात घाम गाळून उगमलेलं ‘लाल सोनं’ आज बाजारात केवळ ५ रुपये किलो दराने विकलं जातंय. ही केवळ दर कपात नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि आशेची थट्टा आहे.
जास्त उत्पादन
या हंगामात टोमॅटोचं उत्पादन उत्तम झालं. पण एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला. परिणामी, दर थेट १००-१५० रुपये प्रति २४ किलो क्रेटवर आले. किरकोळ बाजारातही ५ रुपये किलोने टोमॅटो मिळतोय. एवढ्या कमी दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही.

खर्च जास्त उत्पन्न कमी
१ एकर टोमॅटो लागवडीसाठी बियाणं, खते, औषधं, मजुरी, पाणी आणि वाहतूक अशा सर्वांचा एकूण खर्च ५० ते ६० हजार रुपये येतो. मात्र सध्याच्या बाजारभावानुसार उत्पन्न केवळ १५ ते २० हजारांपर्यंत मर्यादित आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकलेत, घरखर्चही भागवता येत नाही.
टोमॅटो विकून ज्या शेतकऱ्यांना बाजारात न्यायचं भाडेही परवडत नाही, त्यांनी माल शेतातच वाळवायला टाकला आहे किंवा तो जनावरांना चारा म्हणून वापरतो आहे.
“टोमॅटो विकून ५० रुपये मिळतात आणि माल बाजारात नेण्यासाठी १०० रुपये लागतात. अशा उलाढालीत शेतकरी दिवाळखोरीत जाणार.”
– संजय हजारे, शेतकरी, जवळा
शासनाकडून मदतीची मागणी
या भीषण परिस्थितीवर उपाय म्हणून शासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच कमी दराच्या हंगामात हमीभाव किंवा खरेदी योजना लागू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.