उन्हाळा वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वर्गखोल्या थंड ठेवा, प्रथमोपचार आणि पेयजलाची व्यवस्था करा, पोषण आहारात मुलांना सरबत, ताक, ओआरएसचे पाकीट द्या, अशा सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आदेशाद्वारे दिल्या आहेत. पण त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न शाळांना पडला आहे.
शासनाचा आदेश
शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. मात्र, त्यासाठी पुरेसा निधी वेळेवर मिळत नाही. अशा स्थितीत आता वाढत्या उन्हात विविध प्रकारचे नियोजन करण्यासोबत मुलांना ताक, सरबत, ओआरएसचे पाकीट द्या, अशा सूचना दिल्या आहेत.

शाळेच्या वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता शाळेच्या वेळा सकाळी कराव्यात, उन्हामुळे दुपारच्या सत्रात खेळाचे तास नको, असे शासन स्तरावरून आदेश देण्यात आले असले तरी सरबत, ताकासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न आहे.
परिक्षा पुढे ढकलल्या
उन्हाचा तडाखा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा आटोपणे चांगले होते.
मात्र, शासनाने पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. यानंतर पाच दिवसांत पेपर तपासून १ मे रोजी निकालही द्यायचा आहे. हे कसे साध्य होणार आहे, याचा विचार सरकारने केला नाही.
आता हा आदेश काढून शाळांना खर्चात पाडले आहे. शासनाने दिलेले आदेश योग्य असले, तरी या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा प्रश्न आहे. साहित्य खरेदीसाठी लहान शाळांना ५००० व मोठ्या शाळांना १२ हजार ५०० रुपये शाळा संयुक्त अनुदान मिळते, जे यावर्षी मिळाले नाही.
पैश्याची कमतरता
पोषण आहाराचे किंवा शाळांना साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसताना आता या गोष्टींच्या खरेदीसाठी पैसा कोठून आणायचा, असा सवाल शिक्षक संघटनांकडून विचारला जात आहे. शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे अनुदान वेळेवर मिळत नाही. या वर्षीचे अनुदान अद्याप शाळांकडे आले नाही.
बऱ्याच शाळांमध्ये तांदूळ नव्हते, जे दोन दिवसांपूर्वी देण्यात आले. अनुदान वेळेत न मिळाल्याने हा खर्च शिक्षक, मुख्याध्यापकांना करावा लागतो. एखाद्या शाळेत २५ ते ३० मुले असतील, त्यांना जमेल; पण शंभर, दोनशे, अडीचशे विद्यार्थी असलेल्या शाळांना एवढा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे