श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला आहे. काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागात काँग्रेसला मिळालेली पिछाडी आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री यामुळे हे पक्षांतर घडल्याची चर्चा आहे.
माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात नवे समीकरण उदयाला येत आहे. काँग्रेस आता नगरपालिका निवडणुकीसाठी कशी मोर्चेबांधणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीतील पराभव
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांना श्रीरामपूर शहरातून ८,००० मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, चौरंगी लढतीत अपक्ष उमेदवार सागर बेग दुसऱ्या, शिवसेना (शिंदे गट) चे भाऊसाहेब कांबळे तिसऱ्या, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे लहू कानडे चौथ्या स्थानावर राहिले. विशेष म्हणजे, भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये ओगले यांना आघाडी मिळाली नाही. याच पराभवाच्या छायेत नगरसेवकांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
प्रभागातील कामगिरी
संजय फड यांच्या प्रभागात अपक्ष सागर बेग यांनी आघाडी घेतली. तर श्रीनिवास बिहाणी यांच्या प्रभागात भाऊसाहेब कांबळे यांनी त्यांच्या प्रभागात वर्चस्व राखले. आशिष धनवटे आणि मनोज लबडे यांच्या प्रभागांमध्ये ओगले चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शामलिंग शिंदे आणि विजय शेळके या दोघांच्या प्रभागात ओगले यांना मताधिक्य मिळवता आले नाही.
या पराभवामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागातील राजकीय भवितव्याची चिंता सतावत आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून यश मिळण्याची शक्यता कमी वाटल्याने त्यांनी भाजपची वाट धरली.
पक्ष प्रवेश
मंगळवारी मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी नगराध्यक्ष संजय फड, श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, शामलिंग शिंदे, सोमनाथ गांगड, मनोज लबडे, शशांक रासकर आणि विजय शेळके यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांनी शहर विकासाच्या मुद्द्यावर पक्षांतर केल्याचा दावा केला आहे. मात्र, विधानसभेतील प्रभागनिहाय निकाल आणि नगरपालिका निवडणुकीतील अनिश्चितता यामुळे हा निर्णय घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
कार्यकर्त्यांचा पाठिंबा
या माजी नगरसेवकांसह त्यांचे अनेक समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपात दाखल झाले आहेत. यामुळे भाजपची स्थानिक पातळीवरील ताकद वाढण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात प्रभाव टिकवण्यासाठी आणि पालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपला पसंती दिली आहे.
नगरपालिका निवडणुकीची तयारी
नगरपालिका निवडणुका पक्षचिन्हावर लढवल्या जातात, त्यामुळे प्रभागातील प्रभाव टिकवणे प्रत्येक नगरसेवकासाठी महत्त्वाचे असते. काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने आता हेमंत ओगले आणि काँग्रेस नेतृत्वाला नव्या रणनीतीची गरज आहे. पक्षाला आपली ताकद टिकवण्यासाठी नवे चेहरे पुढे आणावे लागतील आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल.श्रीरामपूरच्या राजकारणात काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपातील प्रवेश हा मोठा धक्का आहे. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे