शालेय शिक्षणात मोठा बदल! मराठी शाळांमध्ये आता हिंदी भाषा अनिवार्य, नव्या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

२०२५-२६ पासून नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत मराठी माध्यम शाळांमध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवावी लागणार आहे. अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने २०२८-२९ पर्यंत पूर्ण अंमलात येणार आहे.

Published on -

यंदाच्या जूनपासून शाळांमध्ये नवं शैक्षणिक धोरण लागू होतंय. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार शिकावं लागेल. हा बदल टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांपर्यंत पोहोचेल. विशेष म्हणजे, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकणं आता अनिवार्य असेल. शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय काढून सगळं स्पष्ट केलंय.

चार स्तरामध्ये विभागणी

या नव्या धोरणाची अंमलबजावणी आधीच पदवी अभ्यासक्रमांसाठी २०२३-२४ पासून सुरू झाली होती. आता शालेय शिक्षणातही त्याची सुरुवात होतेय. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्याचा स्वतःचा अभ्यासक्रम आराखडा तयार केलाय. यानुसार, शाळांमधील इयत्तांची विभागणी आता प्राथमिक आणि माध्यमिक अशी न राहता चार स्तरांमध्ये होईल: पायाभूत (३ ते ८ वर्षे, म्हणजे दुसरीपर्यंत), पूर्वतयारी (तिसरी ते पाचवी), पूर्व माध्यमिक (सहावी ते आठवी) आणि माध्यमिक (नववी ते बारावी).

टप्प्याटप्याने पुस्तकांमध्ये बदल

यंदा पहिलीच्या विद्यार्थ्यांना नव्या धोरणानुसार तयार केलेली पाठ्यपुस्तकं मिळतील. पुढच्या वर्षी, म्हणजे २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांमध्ये बदल होईल. त्यानंतर २०२७-२८ मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी, तर २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावीच्या पुस्तकांमध्ये बदल होईल. म्हणजेच, २०२८-२९ पर्यंत सर्व इयत्तांमध्ये हे नवं धोरण पूर्णपणे लागू होईल.

हिंदी भाषा अनिर्वाय

भाषेच्या बाबतीतही मोठा बदल होतोय. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा अनिवार्य असतील. सहावी ते दहावीच्या भाषा धोरणाबाबत निर्णय राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार घेतला जाईल.

नवा शैक्षणिक आकृतिबंध

नव्या धोरणात पारंपरिक १०+२+३ ऐवजी ५+३+३+४ असा नवा शैक्षणिक आकृतिबंध स्वीकारलाय. यामुळे शिक्षण अधिक लवचिक आणि विद्यार्थीकेंद्रित होईल. एससीईआरटी आणि बालभारती नवीन पाठ्यपुस्तकं, पूरक साहित्य आणि ‘सेतू अभ्यासक्रम’ तयार करतील. हे साहित्य सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खबरदारी घेतली जाईल. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन, आवश्यक बदलांसह, ही पुस्तकं तयार केली जातील. प्रत्येक पुस्तक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेल.

नवीन अभ्यासक्रम हा आनंददायी, अनुभवावर आधारित आणि तार्किक विचारांना चालना देणारा असेल. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मूल्यमापनासाठी ‘कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट’ ही पद्धत वापरली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं खरं सामर्थ्य तपासलं जाईल. यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण, शाळांचं वेळापत्रक, परीक्षा नियोजन यासह सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe