प्रत्येक माणसाच्या आतमध्ये आणखी एक धडपडा माणूस असतो आणि तो त्याला स्वस्थ बसू देत नसतो. या आतल्या धडपड्या माणसाकडून अनेक जणांना नवा व्यवसाय-उद्योग करण्यासाठी सतत टोचण मिळत असते. मात्र, आयुष्यातील एखाद-दुसऱ्या अनुभवाला आपण चिकटून बसतो आणि हा विचार मनामध्ये मरतो. पण, या अनुभवातून धडा गिरवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक म्हणजे सचिन मोहन चोभे यांचे ‘उद्योगीनामा’.
मला काही दिवसांपूर्वी छोट्याशा आजारपणामुळे विश्रांती घ्यावी लागली. या काळात माझ्या हातामध्ये हे पुस्तक आले आणि ते मनाला खूप भावले. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखक ग्रामीण भागातून आला आहे आणि त्याच्या लेखणीला ग्रामीण बाज आहे. सचिन चोभे यांनी स्वतः रोजगार हमी योजनेच्या कामापासून सुरुवात केलेली असल्यामुळे त्यांना वास्तवातील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे, शहरांच्या चकचकीत कार्यालयात बसणाऱ्यांपासून माळरानावर काम करत असणाऱ्या प्रत्येकाला समजेल अशी अत्यंत साधी, सोपी, सरळ व कुठेही जड शब्दांचा वापर नसलेली भाषा या पुस्तकात आहे. हीच गोष्ट प्रत्येकाला पुस्तक आपलेसे करून टाकते. ग्रामीण भागातील अनेक तरुणांप्रमाणे त्यांनाही एमपीएससी-यूपीएससी करायची, अधिकारी व्हायचे, ते झालेच नाही तरी सरकारी नोकरी करायची, असे त्यांचेही स्वप्न होते. काहीच झाले नाही, तर शेतीला जोडून व्यवसाय करायचा, हा विचारही त्यांच्या मनामध्ये होता. स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय जीवन या गोष्टींपेक्षा आपल्या मनाला उद्योग करणे जास्त भावते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आयुष्यात अनेक प्रयत्न केले. बऱ्याच अपयशानंतर आता कुठेतरी व्यवसायात स्थिरस्थावर झाले असे वाटते.

जीवनाच्या या चढउताराच्या काळात अपयश आले म्हणून लेखक शांत बसलेला नाही. कुठलाही नकारात्मक विचार केलेला नाही, जवळचे मित्र त्यांना आपल्या व्यवसायात भागीदार म्हणून घेतले. परंतु लेखकावर आलेल्या घरगुती संकटात हे मित्र-भागीदार फसवून निघून गेले, तरीही लेखकाने जिद्द सोडलेली नाही हे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे हे अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
एकूण १८१ पानांचे हे पुस्तक १६ वेगवेगळ्या प्रकरणात विभागले आहे. एखाद्या तरुण उद्योजकाला नवीन व्यवसाय उभा करताना काय अडचणी येऊ शकतात, त्यावर कशी मात करता येऊ शकते याचा मुद्देसूद; परंतु व्यावहारिक उदाहरणे देऊन विस्तृत स्वरुपात विवेचन या पुस्तकात आहे. ही उदाहरणे इतकी अस्सल आणि आपल्या मातीतील आहेत, की या घटना आपल्याच बाबतीत घडत आहेत किंवा घडून गेल्या आहेत, असेच वाटत राहते.
यश मिळवलेल्या लोकांची, उद्योजकांची आत्मचरित्रपर पुस्तके वाचून त्यांचे जीवन आपल्याला कळते. मात्र, बऱ्याच वेळा अपयशी झालेल्या परंतु तरीही न थांबलेल्या आणि नंतर यशस्वी झालेले उद्योजक खूप प्रेरणादायी असतात, ही गोष्ट लेखक आवर्जून सांगतात .
या पुस्तकात अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्रातील अनेक यशस्वी-अयशस्वी उद्योजकांचे दाखले दिले आहेत. तसेच जगप्रसिद्ध उद्योजक टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, केएफसी, थॉमस एडीसन, ॲपल, एचएमटी, नोकिया, मोटोरोला, ब्लॅकबेरी यांच्या यश-अपयशाचा पूर्ण अभ्यास करून विस्तृत विवेचन केले आहे. या अभ्यासामुळे नवीन उद्योजकाला त्याचा फायदाच होणार आहे. व्यवसाय करतांना जगप्रसिद्ध अशी SWOT थिअरीचा कसा वापर केला पाहिजे, मॅनेजमेंट थिअरी काय आहे, बॉस, लीडर कसा नसावा याचेही उत्तम उदाहरण त्यात दिलेले आहेत.
या पुस्तकातून वाचकांना पुढील दशसूत्री मिळते, असे मला वाटते.
१. नवीन व्यवसाय कसा निवडावा, त्याचा अभ्यास कसा करावा?
२. मित्र, नातेवाइक यशस्वी झाला म्हणजे मी ही त्यासारख्याच व्यवसायात यशस्वी झालोच पाहिजे, अशी आकांक्षा धरू नये.
३. व्यवसायातील गुंतवणूकदार व अर्थसहाय्य करणारे यातील फरक कसा ओळखावा?
४. वेळेचे नियोजन कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे?
५. व्यवसाय करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगावा?
६. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, त्याचे महत्त्व, फायदे-तोटे कसे आहेत?
७. इमेज कशी निर्माण करावी व ती टिकविण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी?
८. व्यवसायात टीम निवड कशी करावी व कौशल्याला किती महत्त्वाचे स्थान आहे?
९. व्यवसायात धैर्य आणि संयम किती महत्त्वाचा आहे?
१०. वाचनाचे व अनुभवाचे महत्त्व.
चौकट :
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद या ग्रामीण भागातील तरुण लेखक सचिन मोहन चोभे यांचे उद्योगीनामा हे दुसरे पुस्तक. हे पुस्तक ॲमेझॉनवर अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण उद्योजकांनी हे पुस्तक नक्की वाचावे, त्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रेरणादायी होईल, यात कुठलीही शंका नाही.