एप्रिल महिन्याची तीव्र उष्णता आता चांगलीच जाणवू लागली असून अकोले, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांतील अनेक गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. परिणामी, या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 69 गावं आणि 362 वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे.
एकूण 1 लाख 38 हजार नागरिकांसाठी 69 टँकर कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वाधिक 23 टँकर पाथर्डी तालुक्यात चालू आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर्षी 643 गावांना टंचाई भेडसावणार असल्याचे लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना आखल्या आहेत. नियोजनानुसार, टँकर भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांमध्ये पुरेसा साठा असून तो जुलैच्या अखेरीपर्यंत टिकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही, नेहमीप्रमाणे एप्रिलपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्यामुळे अवघ्या दोन आठवड्यांत परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार, 643 गावं आणि 2415 वाड्यांमध्ये टंचाई उद्भवणार असून त्यातील 496 गावं आणि 2244 वाड्यांमध्ये केवळ टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. इतर भागांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोल करणे, तात्पुरत्या जलयोजना आणि नळयोजनांची दुरुस्ती अशा विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
टँकरसाठी जलस्रोतांची तयारी
अहिल्यानगर तालुक्यात टँकर भरण्यासाठी इंद्रायणी, वसंत टेकडी आणि घोसपुरी हे जलस्रोत वापरले जात आहेत. पारनेरमध्ये मांडओहळ, वाडेगव्हाण आणि शिरापूर, तर कर्जतमध्ये मांदळी, दूरगाव आणि खेड याठिकाणी टँकर भरण्यात येत आहे.
पाथर्डीमध्ये अमरापूर, पांढरीपूल आणि राक्षी, शेवगावमध्ये शहरटाकळी पाणीपुरवठा योजना, संगमनेरमध्ये रायतेवाडी, कौठे बु., संगमनेर शहर, आणि अकोले तालुक्यात बोरी, अकोले पाडोशी, वागदरी, आंबित व रंधा बु. हे ठिकाणे जलस्रोत म्हणून वापरली जात आहेत. यातील काही ठिकाणांचा साठा जुलै अखेरपर्यंत पुरेल, तर काही ठिकाणी बाराही महिने पाणी उपलब्ध आहे.
सध्या संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये टँकर सेवा सुरू असून, पारनेर शहरातील 5 हजार लोकसंख्येला 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यामुळे, टँकरची संख्याही लवकरच वाढण्याची शक्यता आहे.