अहिल्यानगरमधील वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी बनली डॉक्टर, आईबापाच्या कष्टाचं केलं चीज!

अहिल्यानगरच्या अशोकनगरमधील वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी पूजा शिंदे हिने कठीण परिस्थितीतही एमएस ऑप्थल्म ईएनटी पदवी मिळवून डॉक्टर झाली. आई-वडिलांच्या कष्टांना न्याय देत तिच्या यशाने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर- गरिबी कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, हे अहिल्यानगर तालुक्यातील अशोकनगर फाटा येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने सिद्ध केले आहे. सुनील शिंदे यांची कन्या डॉ. पूजा शिंदे हिने मुंबईतील रा. आ. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयातून (वरळी) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला यशाची जोड दिली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची

सुनील शिंदे यांचा रोजचा दिनक्रम अत्यंत खडतर आहे. पहाटे वृत्तपत्र वितरण, त्यानंतर चहा विक्री आणि पानटपरी चालवणे, अशा कष्टप्रद कामातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नी सुनीता याही या कामात खांद्याला खांदा लावून साथ देतात. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अथक परिश्रम घेतले.

त्यांच्या या मेहनतीला मुलांनीही मेहनतीने साथ दिली. त्यांची मुलगी पूजा हिने आपले प्राथमिक शिक्षण शिरसगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून घेतले, तर माध्यमिक शिक्षण भि. रा. खटोड कन्या शाळेतून आणि अकरावी-बारावी बोरावके महाविद्यालयातून पूर्ण केले.

घरच्यांचा पाठिंबा

पुढे पूजाने कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून बीएएमएस (आयुर्वेद) पदवी मिळवली. मात्र, तिची शिकण्याची जिद्द येथेच थांबली नाही. पदव्युत्तर शिक्षण घेण्याची तिची इच्छा पाहून आई-वडिलांनी आर्थिक अडचणींना न जुमानता तिला पूर्ण पाठिंबा दिला. यामुळे तिने एमएस ऑप्थल्मॉलॉजी आणि ईएनटी या विषयात पदव्युत्तर शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

तिच्या शिक्षणाच्या प्रवासात शिरसगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नईमा खान, खटोड कन्या शाळा आणि बोरावके महाविद्यालयातील शिक्षक, तसेच स्वर्गीय किशोर पांडे (वृत्तपत्र वितरक), पत्रकार अनिल पांडे आणि डॉ. विनायक मोरगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूजाचा भाऊ आकाश सध्या एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे, ज्यामुळे शिंदे कुटुंबाचा शिक्षणावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव

डॉ. पूजा यांनी पात्रता परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्या महाराष्ट्रात ८०व्या, तर देशात ३१६व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. शासकीय कोट्यातून तिला स्टायपेंडसह प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. पूजा म्हणाल्या, “परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आई-वडिलांच्या कष्टाचे स्मरण ठेवले, तर यश निश्चितच मिळते. माझ्या यशाचे खरे श्रेय माझ्या पालकांच्या मेहनतीला आहे.” तिच्या या यशाने केवळ शिंदे कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण अशोकनगर परिसराचा गौरव वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe