Ahilyanagar News : सध्या उन्हाची काहिली वाढत असल्याने या उन्हाच्या कडाक्यातून शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगड, लिंबू, ऊस आणि काकडीला मागणी वाढत आहे. परंतु यंदा वातावरणाचा या फळांच्या उत्पादनावर देखील विपरीत परिणाम झाला असून दर्जाही खालावला आहे.
फळांचे भाव वाढल्याने या फळांचे भाव पाहून सर्वांना घाम फुटला आहे तर स्थानिक कलिंगडाचा गोडवा कमी झाला आहे. निसर्गाची देण असलेले कलिंगड, लिंबु सरबत, ऊसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालविण्यासाठी सर्वांसाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आणि आधार आहे.

परंतु सध्या वाढत असलेला उन्हाचा प्रचंड चटका व त्या तुलनेत येत मिळत असलेले उत्पन्न यामुळे या फळांचे भाव बऱ्यापैकी वाढलेले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० ते २५ टक्यांनी भाव वाढले आहेत. शहरात जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील कलिंगड विक्रीसाठी येत आहेत. यंदा लहरी हवामानाचा संत्रा, मोसंबी तसेच लिंबाला देखील फटका बसला असून लिंबाचीही आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचेही भाव वधारले आहेत.
लिंबाला तर संत्री आणि मोसंबी इतका भाव आहे. त्यामुळे लिंबू सरबत ही महागले आहे. कोकम आणि काकडीचे भावही वधारले आहे. अनेक ठिकाणी तर काकडी आणि कोकमचे दर्शनही नाही. मागील वर्षीपेक्षा यावर्षी कलिंगडामध्ये २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे.
तर एका मोठ्या काकडीमागे पाच ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी उष्म्यापासुन बचाव करण्यासाठी आता नैसर्गिक पर्याय सोडुन कृत्रिम पर्याय निवडत आहेत. त्यामध्ये बंद बाटलीतील सरबते आणि, प्लास्टिकच्या पाऊच मध्ये मिळणारी सरबत यांना मागणी वाढत आहे.
सध्या अहिल्यानगरच्या बाजार समितीत लिंबाची आवक कमी होत असून भाव देखील वधारलेले आहेत. रविवारी अवघी २९ क्विंटल लिंबाची आवक झाली. त्याला ५५०० – ९००० हजार रूपये असा भाव मिळाला. मोसंबी १००० ६०००, संत्रा २००० १३०००, डाळिंब २००० – १०,०००, पेरू १००० ४५००, द्राक्षे २००० -४०००, कलिंगड ३०० १३००, खरबूज ५०० – १५००.