नेरळ माथेरान घाट आता अधिक सुरक्षित, पावसाळ्यातील धोका टळणार

Published on -

Matheran News : कर्जत नेरळ-माथेरान घाट रस्ता सुरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी आपली वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांना घाट रस्ता सुरक्षित वाटावा यासाठी भर देण्यात आला आहे.

माथेरान चांगभलं मंदिर येथून घाट रस्त्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात येत आहेत. वॉटर पाइप भागातही दरडी कोसळण्याच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत आहे.

राज्यातील घाट रस्त्यात अगदी जवळून असलेल्या वळणामुळे नेरळ-माथेरान घाट रस्ता वाहनांसाठी अवघड समजला जातो. पूर्वी एकेरी मार्ग असताना हा रस्ता वाहनचालकांसाठी कसोटीचा समजला जायचा.

मात्र, राज्य सरकारच्या कोकण पॅकेजमधून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आणि नंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नेरळ-माथेरान घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहनाच्या सुरक्षेसाठी कामे केली गेली. या घाटासाठी संरक्षण भिंतींचे जाळे उभारण्यात आले असून नेरळ-माथेरान घाट रस्ता आता सुरक्षित समजला जातो.

मात्र, या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या डोंगरकड्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात अतिशय धोकादायक समजला जातो. त्यामुळे या घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात, यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडून शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत होता.

आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील आपल्या मतदारसंघातील पर्यटन स्थळ अधिक सुरक्षित व्हावे यासाठी नेरळ-माथेरान घाट रस्त्याकडे विशेष लक्ष दिले आहे. घाट रस्त्यात लोखंडी जाळ्या लावून रस्ता सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. महत्त्वाच्या दोन ठिकाणी लोखंडी जाळ्या लावून दरडी रोखण्यात यश आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील वॉटर पाईप स्टेशन परिसरात उभ्या कड्यावरील दगड खाली येऊन अपघात होऊ नये यासाठी संरक्षण जाळ्या बसवण्याचे हाती घेतलेले काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान घाट रस्ता आणखी सुरक्षित होण्यास मदत होत आहे.

बांधकाम खात्याच्या या प्रयत्नानंतर खासगी वाहनांचा सुरक्षित प्रवास होऊ लागला आहे, अशी प्रतिक्रिया नेरळ-माथेरान घाटात प्रवासी टॅक्सीसेवा देणाऱ्या चालकांकडून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News