कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ (EPFO) हा प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याला उज्वल करण्यासाठी फायदेशीर ठरतो. या रिटायरमेंट प्लानमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघांचाही बरोबरीचा वाटा असतो. तुमच्या पगारातून ठराविक रक्कम कापण्यात येते आणि ती रक्कम पीएफमध्ये जमा करण्यात येते. यावर तुम्हाला ईपीएफओकडून वर्षाला व्याज सुद्धा मिळतो. काही गरजेच्या काळात तुम्ही रिटायर होण्यापूर्वी सुद्धा पीएफमधून पैसे काढू शकता. जाणून घ्या पीएफ अकाऊंटमधून नेमके किती पैसे काढू शकता, हे आपण पाहूयात…
कधी काढू शकतो पीएफ?
1. काही ठराविक परिस्थितीत तुम्ही रिटायर होण्यापूर्वी पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकता. त्यात मेडिकल एमर्जन्सी, लग्न, जमीन खरेदी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली तर तो व्यक्ती दोन महिन्यांनंतर पीएफमधून पूर्ण पैसे काढू शकते.
2. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही पीएफचा पैसा काढू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला नोकरीला लागून कमीत कमी सात वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही तुमच्या एकूण पीएफ रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकता.

पीएफचे पैसे किती वेळा काढता येतात?
आपल्या पीएफ अकाऊंटमधून आपल्याला गरजेच्या वेळी केव्हाही पैसे काढता येतात. फक्त पैसे काढण्यासाठी आपल्याकडे वैध आणि ठोस कारण असायला हवे. लग्नाचे कारण असेल तर तीनपेक्षा अधिक वेळा पैसे काढता येणार नाहीत. 10 वी नंतरच्या शैक्षणिक खर्चासाठी सुद्धा ही अट लागू आहे. घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही एकदा पैसे काढू शकता. तर मेडिकल एमरजन्सी असल्यास कधीही आणि कितीही वेळा पैसे काढता येऊ शकता.