Explained – Shrirampur Elections : गेल्यावेळी पंचायत समितीत रंगलेले सत्तांतर नाट्य, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत महायुतीचा झालेला विजय, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा वाढलेला टक्का श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण बदलतंय, हे दाखविण्यास पुरेसा आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत श्रीरामपूर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूकही रंगणार आहे. या निवडणुकीत विखे गट, मुरकुटे गट, ससाणे गट आदींसह इतर हिंदूत्ववादी गटांनाही आपली ताकद दाखवता येणार आहे.
गेल्या वेळी पंचायत समिती सभापती निवडीची प्रक्रिया थेट न्यायालयात गेली होती. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही निवडणुका रंगतदार होणार आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचा एक गट, व पंचायत समितीचे दोन गण वाढल्याने यंदाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल? श्रीरामपूर पंचायत समितीची निवडणूक कशी होईल? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

ज्यांना बदलत्या राजकारणाचा आभ्यास करायचाय, त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याचा आभ्यास नक्की करावा. कधीकाळी 70 टक्के मतदान घेऊन काँग्रेसचा बालेकिल्ला झालेल्या या मतदारसंघात विधानसभेचे आरक्षण लागल्याने अनेक स्थित्यंतरे झाली. आदिक कुटुंब, त्यानंतर मुरकुटे कुटुंब, त्यानंतर ससाणे कुटुंब, त्यानंतर कांबळे, कानडे आणि आता ओगले अशा बदलत्या नेतृत्त्वात श्रीरामपूर अजूनही चाचपडताना दिसतंय.
त्यातच सुरुवातीला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या तालुक्यात जातीने लक्ष घातल्याने या तालुक्याचे राजकारण सुपर हाँट राहिले. सध्या या तालुक्यात हिंदूत्ववादी संघटनांच्या मतांचा टक्का वाढलाय. विखे गटाची चलतीही वाढलीय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत विखे गट दखलपात्र ठरु लागलाय.
श्रीरामपूर तालुक्यातील यावेळची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जरा वेगळी ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणात फेरबदल झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. या फेरबदलात पूर्वीच्या गट व गणात तोडफोड झाल्याने अनेकांची पंचायत झाली आहे. राजकीय समिकरणे बदलणार आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात 2017 च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 4 गट, तर पंचायत समितीचे 8 गण होते. नव्या रचनेनुसार आता जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत. निपाणीवडगाव गटाची निर्मिती होऊन त्यात कारेगाव हा नवा गण तयार झाला आहे.
याच कारेगाव गणात पुर्वी पढेगाव गणात असलेल्या मालुंजा बुद्रूक, भेर्डापूर, वांगी बुद्रूक, वांगी खुर्द, गुजरवाडी व खिर्डी या गावांचा समावेश झाला आहे. पढेगाव गणातील गावे तूटुन आता पढेगाव गणात मातापूरचा नव्याने समावेश झाला आहे. शिवाय पुर्वीच्या उक्कलगाव गणातील खंडाळा गावाचा दत्तनगर गणात, तर दत्तनगर गणातील शिरसगावचा टाकळीभान गटात समावेश होऊन शिरसगाव या नव्या गणाची निर्मिती झाली आहे.
निपाणी वडगाव हा गट तसेच शिरसगाव व कारेगाव हे दोन गण श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण बदवणारे ठरणार आहेत. नव्या रचनेमुळे निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढणार असून, तोडफोडीमुळे अनेकांची अडचणही होणार आहे. गट व गणाची रचना कशी बदलली ते आपण एकदा पाहू…
1. उंदिरगाव गट
या गटात उंदीरगाव गण व निमगाव खैरी गण असे दोन गण आहेत.
त्यात उंदीरगाव गणातील उंदिरगाव, माळवडगाव, हरेगाव, महांकाळवडगाव या चार ग्रामपंचायती व
निमगाव खैरी गणातील निमगाव खैरी, गोंडेगाव, मातुलठाण, नायगाव, जाफराबाद, रामपूर, नाऊर, सराला, माळेवाडी, गोवर्धनपूर या या दहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
2. टाकळीभान गट
याच टाकळीभान गण व शिरसगाव गण अशा दोन गणांचा समावेश आहे.
टाकळीभान गणात खानापूर, भामाठाण, कमालपूर, मुठेवडगाव, घुमनदेव व टाकळीभान अशा 6 ग्रामपंचायती आहेत.
तर शिरसगाव गणात भोकर, वडाळामहादेव व शिरसगाव या तीन ग्रामपंचायती आहेत.
3. दत्तनगर गट
या गटात दत्तनगर गण व उक्कलगाव गण अशा दोन गणांचा समावेश आहे.
दत्तनगर गणात ब्राम्हणगाव वेताळ, भैरवनाथनगर, दिघी, खंडाळा व दत्तनगर अशा 5 ग्रामपंचायती व
उक्कलगाव गणात उक्कलगाव, कडीत बु, कडीत खुर्द मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, एकलहरे व गळनिंब अशा 8 ग्रामपंचायती आहेत.
4. बेलापूर गट
या गटात बेलापूर गण व पढेगाव गण असे दोन गण आहेत.
बेलापूर गणात बेलापूर बु, ऐनतपूर, बेलापूर खु व नर्सरी अशा ग्रामपंचयती व
पढेगाव गणात पढेगाव, मातापूर, वळदगाव, लाडगाव, कान्हेगाव व उंबरगाव या सहा ग्रामपंचायती आहेत.
5. निपाणी वडगाव गट
निपाणी वडगाव गण व कारेगाव गण असे दोन गण आहेत.
निपाणी वडगाव गणात खोकर व निपाणी वडगाव या दोन ग्रामपंचायती व
कारेगाव गणात कारेगाव, मालुंजा बु, भेर्डापूर, वांगी बु, वांगी खु, गुजरवाडी व खिर्डी या सात ग्रामपंचायती आहेत.
2022 साली काढण्यात आलेल्या पंचायत समितीच्या आरक्षणात
निमगाव खैरी- अनुसुचीत जमाती
उंदीरगाव- अनुसूचित जाती
टाकळीभान- सर्वसाधारण महिला
शिरसगाव- अनुसुचित जाती महिला
दत्तनगर- सर्वसाधारण
उक्कलगाव- सर्वसाधारण महिला
बेलापूर बुद्रुक- नागरिकांचा मागास प्रवर्ग
पढेगाव- सर्वसाधारण महिला
निपाणी वडगाव- सर्वसाधारण
कारेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाले होते.
यंदाही श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विखे गट, मुरकुटे गट व ससाणे गट अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक कोर्टात गेली होती. त्यामुळे यंदाही ही निवडणूक तेवढीच चुरशीची होण्याची शक्यता आहे.