7th Pay Commission : सध्या सर्वत्र आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. जानेवारी महिन्यात केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.
कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. त्यानुसार सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल आणि त्यानंतर नवा वेतन आयोग लागू होणार आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

दरम्यान, आता आपण पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढलाय ? आणि आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
मीडिया रिपोर्टनुसार, एक जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या आठव्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 186 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 18 हजार रुपये आहे मात्र नवीन आठवा वेतन आयोगात हा किमान मूळ पगार 51 हजार 480 रुपये होण्याची शक्यता आहे.
पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंतची पगारवाढ
पहिला वेतन आयोग : हा आयोग 1947 मध्ये लागू झाला होता. पहिल्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 55 रुपये आणि कमाल वेतन दोन हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले होते. याचा फायदा देशभरातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना झाला होता.
दुसरा वेतन आयोग : ऑगस्ट 1957 मध्ये दुसरा वेतन आयोग लागू झाला. यामध्ये किमान मासिक वेतन 80 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती. दुसऱ्या वेतन आयोगाचा फायदा लाखों सरकारी कर्मचाऱ्यांना झाला होता.
तिसरा वेतन आयोग : तिसऱ्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 185 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती. या वेतन आयोगाचा फायदा 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना झाला होता.
चौथा वेतन आयोग : चौथ्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 750 रुपये इतका करण्यात आला होता.
पाचवा वेतन आयोग : पाचव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 2550 रुपये प्रति महीना इतका करण्यात आला होता. याचा फायदा जवळपास 40 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना झाला.
सहावा वेतन आयोग : सहाव्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार सात हजार रुपये एवढा निश्चित करण्यात आला आणि कमाल पगार 80 हजार रुपये एवढा झाला होता.
सातवा वेतन आयोग : सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू असून या अंतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 7000 रुपयांवरून 18 हजार रुपये एवढा करण्यात आला.