AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेला आली जाग ! सीना नदी पात्रात जलपर्णी हटवण्याचे काम सुरू

Published on -

AMC News : अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. महानगरपालिकेमार्फत ओढे व नाल्यांची साफसफाई सुरूच आहे. तसेच, सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून या जलपर्णी काढून प्रवाह मोकळे करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे.

शहरात जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत, तिथे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ मदत उपलब्ध करून देत आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात अथवा संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ओढे नाले साफसफाई सुरू आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभर शहरात सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्या होत्या. सोमवारी रात्रीपासूनच महानगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत या जलपर्णी काढून प्रवाह मोकळा करण्याचे काम सुरू केले आहे.

रात्रभर काम सुरू होते व आताही सुरूच आहे. शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई बहुतांश प्रमाणात पूर्ण झाली आहे. उर्वरित साफसफाई सुरू असून, तीही येत्या दोन ते चार दिवसात पूर्ण होईल. यंदा पाऊस लवकर आल्याने नालेसफाईच्या कामात काहीसे अडथळे येत आहेत. मात्र, तरीही त्यावर उपाययोजना करून प्रवाह मोकळे करण्याचे काम सुरू असल्याचे अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर महानगरपालिका सज्ज आहे. आपल्या घरात पाणी शिरले असल्यास अथवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्यास प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

प्रभाग समिती कार्यालय क्र.१ सावेडी श्री. निखिल फराटे मोबाईल 9923274349, प्रभाग समिती कार्यालय क्र.२ शहर, श्री. राकेश कोतकर मोबाइल 9284542036 किंवा 9403377725, प्रभाग समिती कार्यालय क्र.३ झेंडीगेट श्री. शाम गोडाळकर मो. न. 8788213270, प्रभाग समिती कार्यालय क्र.४ बुरुडगाव श्री.अनिल बाबर मो. न. 9890639090 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, धोकादायक इमारत हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पार गल्ली, माळीवाडा परिसरातील धोकादायक इमारतीचा काही भाग यशस्वीरित्या पाडण्यात आला आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही तातडीची आणि आवश्यक कारवाई करण्यात आली असून उर्वरित भागही लवकरच नोटीस देऊन पाडण्यात येईल.

शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी उद्यान विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून झाडे हटवण्याचे काम सुरू असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News