संगमनेर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वारे बदलल्याचा काही लोकांचा समज झाला. त्यामुळे धावपळ करत काहींनी पक्ष बदलले. मात्र, त्यांचा हा निर्णय शंभर टक्के चुकेल. मतदार त्यांना मानणार नाहीत.
त्यांचे उड्या मारणे लोकांना आवडले नसल्याने ज्यांनी-ज्यांनी वेगळ्या पक्षाचा आधार घेतला त्यांना पराभव पत्करावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शनिवारी संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, राजकारण केवळ पदाचे नसते, ते तत्वाचेदेखील असते.
अनेकांनी सत्तेच्या लालसेने पक्ष सोडले. यात दोघांचाही दोष आहे. ज्या पक्षाने आपल्याला तत्वज्ञान, विचार दिले, तो विचार आपण मानला पाहिजे. त्या तत्व, विचारावर राजकारण करण्याची गरज आहे. काही लोकांनी याच विचारधारेवर विरोधी पक्षात आयुष्य काढले.
आता मात्र दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. लोकसभेच्या निकालानंतर सरकारचे भान गेले. काही केले तरी लोक मतं देतात असा त्यांचा गोड गैरसमज झाला. निवडणुकीत जनता त्यांचा हा समज दूर करेल. शेतकऱ्यांची दुरवस्था, पुरासंदर्भात झालेले दुर्लक्ष, अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.
तुमच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे उमेदवार असतील का, असे विचारल्यावर थोरात म्हणाले, विखे कुटुंबीय भाजपमध्ये आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार उभा करायचा हा त्यांचा विषय आहे. समोर कोण उमेदवार आहे, याची मला काळजी नाही.