श्रीगोंदे: भानगाव खूनप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. मुख्य आरोपीसही बेड्या ठोकण्यात आल्या. २४ तासांत सर्व आरोपी जेरबंद केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी शनिवारी दिली.
नानासाहेब ज्ञानदेव आघाव याच्या भानगाव येथील शेतजमिनीची मोजणी ५ सप्टेंबरला भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात झाली. मोजणी करून अधिकारी व कर्मचारी गेल्यानंतर शेत मोजणीच्या ठिकाणी दुपारच्या सुमारास काळे व आघाव कुटुंबीयांत भांडणे झाली. यात गणेश काळकुशा काळे (२ वर्ष) या चिमुरड्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जमा काळकुशा काळे (वय ३४) यांच्या फिर्यादीवरून नानासाहेब ज्ञानदेव आघाव, तुकाराम नाना आघाव, विष्णू आघाव, विशाल आघाव यांच्यावर खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने तीन आरोपी जागीच मिळाले.
मुख्य आरोपी असलेल्या नानासाहेब आघाव फरार झाला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपी २४ तासांत जेरबंद करण्यात आल्याचे सातव व पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सातव, दौलतराव जाधव, विठ्ठल पाटील, अंकुश ढवळे, उत्तम राऊत, किरण बोराडे, दादा टाके, इरफान शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.