मुलाखतींमधून व्यक्तींच्या आयुष्याच्या खोलसखोल गाठी उलगडणारा एक पॉडकास्टर सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विजय मल्ल्याची मुलाखत घेऊन चर्चेचा विषय ठरलेला राज शमानी हा तरुण आपल्या मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याची यशोगाथा केवळ प्रेरणादायी नाही, तर ती दाखवते की सामान्य पार्श्वभूमीतून आलेला व्यक्तीही जगभरात नाव मिळवू शकतो.

राज शमानीची यशोगाथा
राज शमानी हा केवळ यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर नाही, तर तो एक प्रभावशाली प्रेरणादायक वक्ता, यशस्वी उद्योजक आणि पॉडकास्टिंग जगतातील एक मोठं नाव बनला आहे. ‘Figuring Out’ नावाच्या त्याच्या पॉडकास्टमध्ये उद्योग, करिअर, समाज आणि राजकारण यासारख्या विविध विषयांवर तो दिग्गजांशी प्रामाणिक संवाद साधतो. याच प्लॅटफॉर्मवर त्याने अलीकडेच विजय मल्ल्याची थेट मुलाखत घेतली आणि त्या क्षणापासून तो देशभर चर्चेत आला.
राजचा जन्म 29 जुलै 1997 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका सामान्य गुजराती कुटुंबात झाला. त्याचे वडील केमिकल उद्योग चालवत होते, आणि राजही वयाच्या 16 व्या वर्षी त्यांच्या व्यवसायात उतरला. त्याच वेळी त्याने स्वतःचा ‘Magician Drop’ हा ब्रँड सुरु केला आणि साबण, सौंदर्यप्रसाधनं विकायला सुरुवात केली. इथूनच त्याच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
डिजिटल दुनियेतील प्रवास
डिजिटल दुनियेत राजने सुरुवात केली इंस्टाग्रामवरील मोटिवेशनल व्हिडिओंनी. त्याची शैली अगदी थेट, स्पष्ट आणि परिणामकारक होती. कालांतराने त्याने यूट्यूबवर पॉडकास्ट सिरीज सुरु केली, ज्याने त्याला देशातलं सर्वात लोकप्रिय पॉडकास्टर बनवलं. त्याचा ठाम आवाज, मुद्देसूद विचार आणि संवादातील प्रामाणिकपणा यामुळे श्रोत्यांचं प्रेम मिळालं.
आज राज शमानीची संपत्ती देखील लक्षवेधी आहे. 2024 च्या अंदाजानुसार, त्याची एकूण नेट वर्थ जवळपास 11 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 91 कोटी रुपये आहे. त्याचे उत्पन्न ‘Shamani Industries’, ‘House of X’ ब्रँड आणि सोशल मीडियावरून येतं. यूट्यूबवरील जाहिरातींमधून तो दरवर्षी 20 लाख रुपयांहून अधिक कमावतो, तर शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमधून सुमारे 15 कोटी रुपये कमावतो.
राज शमानीचं आयुष्य हे केवळ आकड्यांमधून मोजता येणारं नाही. त्याच्या प्रवासात जिद्द आहे, परिस्थितीवर मात करण्याची धडपड आहे, आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आहे. आज तो लाखो तरुणांचा आदर्श ठरला आहे, आणि त्याचं काम हे स्पष्ट दाखवून देतं की, योग्य दृष्टिकोन आणि चिकाटीने काहीही शक्य आहे