उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या की शरीरासोबतच आपल्या गाड्यांचीही परीक्षा सुरू होते. अशा वेळी जर गाडीचा एसी नीट थंड हवा देत नसेल, तर गाडी चालवणे म्हणजे एक प्रकारचा छळच वाटतो. बाहेर सूर्य आग ओकत असतो आणि आत गाडीत बसूनही घामाच्या धारा सुरू असतात. तुमच्याही गाडीचा एसी हल्ली काहीसा निष्क्रिय वाटतोय का? मग काळजी करू नका, कारण काही साध्या पण प्रभावी टिप्सने तुम्ही गाडीतील एसी ठीक करू शकता.

कूलंटची पातळी
अनेकदा आपण गाडीचा एसी चालू केला की लगेच थंड हवा यावी, अशी अपेक्षा ठेवतो. पण त्यामागे काही तांत्रिक आणि सवयीशी संबंधित बाबी असतात. उदाहरणार्थ, गाडीमध्ये कूलंट कमी असणे हे एक प्रमुख कारण असते. उन्हात इंजिन तापते आणि त्याचा परिणाम थेट एसीवर होतो. जर कूलंट योग्य प्रमाणात नसेल, तर एसी नीट काम करत नाही. त्यामुळे कूलंटची पातळी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.
रीसर्क्युलेशन मोड
तसंच, गाडीत बसताच एसी चालू करणं टाळावं. बाहेरून आलेली गरम हवा गाडीच्या आतील भागात साचलेली असते. त्यामुळे काही मिनिटं खिडक्या उघडून ब्लोअर सुरू ठेवलं, तर ही गरम हवा बाहेर जाते. त्यानंतर एसी सुरू केल्यास, थंड हवा लगेच अनुभवता येते. रीसर्क्युलेशन मोड वापरणेही फायदेशीर ठरते कारण त्यामुळे गाडीतील हवाच पुन्हा थंड केली जाते.
उन्हात पार्किंग टाळा
पार्किंगचा सुद्धा एसीच्या थंडपणावर मोठा परिणाम होतो. जर तुम्ही गाडी नेहमी उन्हात पार्क करत असाल, तर आतील उष्णता एसीला काम करायला अधिक वेळ लावते. त्यामुळे शक्य असल्यास गाडी नेहमी सावलीत पार्क करा. सावलीत राहिल्यामुळे गाडी आतून तुलनेत थंड राहते आणि एसी लवकर परिणाम दाखवतो.
नियमित सर्व्हिसिंग
याशिवाय, एसीची नियमित सर्व्हिसिंग करणे अत्यावश्यक असते. एसी गॅस कमी झालेला असेल, पाईप्समध्ये धूळ जमा झालेली असेल किंवा फिल्टर ब्लॉक झाला असेल, तर थंडपणाची कार्यक्षमता कमी होते. वेळेवर सर्व्हिसिंग करून एसीला हवा असलेला पुरेसा थंडावा टिकवता येतो.
विंडो शेड्स वापरा
कारच्या काचांमधून येणारा सूर्यप्रकाशसुद्धा गाडी गरम होण्यामागे एक मोठं कारण आहे. त्यामुळे विंडो शेड्सचा वापर करून आत येणारा उष्णतेचा मारा कमी करता येतो. ही एक स्वस्त आणि सहज मिळणारी गोष्ट आहे, पण तिचा उपयोग फार मोठा आहे.