उन्हाळ्याच्या दिवसात अंगणात पाणी घालून गारवा निर्माण करताना जर तुम्ही तिथे एक विशेष औषधी वनस्पती लावली, तर ती फक्त घराला शोभा देणार नाही, तर तुमच्या घरखर्चात हातभार लावणारा एक लहानसा पण मोठा व्यवसाय देखील ठरू शकतो. ही वनस्पती म्हणजे आपल्या घराघरात श्रद्धेने पूजली जाणारी तुळस. पण ही तुळस केवळ पूजेसाठी नाही, ती तुमचं आर्थिक नशीबही उजळवू शकते.

भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना अर्पण केल्या जाणाऱ्या तुळशीला केवळ धार्मिक नव्हे, तर औषधी महत्त्वही आहे. तिच्या पानांमध्ये असलेले औषधी गुणधर्म अनेक आजारांवर उपयोगी पडतात. मग ते सर्दी-खोकला असो, अपचन असो किंवा इम्युनिटी वाढवण्याची गरज असो. त्यामुळेच तिची मागणी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि अगदी अॅलोपॅथी औषधांमध्येही प्रचंड आहे.
तुळशीचा व्यवसाय
तुळशीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर खूप मोठ्या जागेची किंवा खर्चाची नसते. तुम्ही तुमच्या अंगणात, गच्चीत किंवा अगदी छोट्या बागेत तुळशीची लागवड करू शकता. सुरूवातीला फक्त 5,000 रुपयांत रोपे, माती, खत आणि पाण्याच्या साधनांवर खर्च होतो. जर तुम्ही यामध्ये थोडी अधिक गुंतवणूक केली, उदा. 15,000 रुपये तर तुम्ही छोट्या प्रमाणावर व्यवसायाचं मोठं स्वरूप उभारू शकता.
या व्यवसायाचं विशेष म्हणजे त्याचं पीक फक्त 3 महिन्यांत तयार होतं. यानंतर, तुम्ही तुळशीची पाने, देठ किंवा त्यापासून काढलेलं तेल थेट बाजारात विकू शकता किंवा डाबर, पतंजली, बैद्यनाथ यांसारख्या आयुर्वेदिक कंपन्यांशी करार करून पीक त्यांना पुरवू शकता. सरासरी पाहता 1 एकर शेतीतून तुम्ही एका हंगामात 1.5 ते 2 लाख रुपये सहज कमवू शकता, म्हणजे तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या जवळपास 3-4 पट नफा.
तुळशीची लागवड करताना जर तुम्ही RRLOC 12 किंवा RRLOC 14 या जातींचा विचार केला, तर त्यातून अधिक उत्पादन मिळू शकतं. योग्य अंतरावर रोपे लावणे, वेळेवर पाणी देणे, आणि काढणीच्या 10 दिवस आधी पाणी थांबवणे ही काळजी घेतल्यास तुमचं उत्पादन अधिक दर्जेदार होईल.