आजच्या काळात डॉक्टर होणं हे कित्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. पण 1800 च्या दशकात, जेव्हा स्त्रियांसाठी शिक्षण घेणंही अकल्पनीय होतं, तेव्हा एका मराठी मुलीने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. ही कहाणी आहे आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर.

महाराष्ट्रात 31 मार्च 1865 रोजी जन्मलेल्या या मुलीचं नाव होतं यमुना. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. ते तिच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते, पण मनाने आधुनिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या पत्नीचं नाव ‘आनंदी’ ठेवलं आणि तिच्या शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी आनंदीला मराठी, संस्कृत, आणि इंग्रजी शिकवलं. एका स्त्रीला तेव्हा अशा पद्धतीचं शिक्षण देणं हे अत्यंत क्रांतिकारी होतं.
आनंदीबाई यांचा प्रवास
पण तिच्या जीवनात एक मोठा दुःखद प्रसंग आला, जेव्हा ती आई झाली. खरं तर हा आनंदाचा प्रसंग होता. मात्र, योग्य उपचाराअभावी त्यांनी आपल्या बाळाला गमावलं. त्या काळात महिला डॉक्टर नसल्याने स्त्रियांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घ्यायला संकोच वाटे. याच अनुभवामुळे आनंदीबाईंमध्ये एक तीव्र प्रेरणा निर्माण झाली, तिला डॉक्टर व्हायचं होतं, इतर महिलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी.
ही इच्छा पूर्ण करणं काही सोपं नव्हतं. एक भारतीय स्त्री म्हणून अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणं हे तेव्हा समाजासाठी एक धक्का होता. समाजाच्या टीका, विरोध, आणि रूढींना तोंड देत 1883 मध्ये त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अमेरिकेत थंडी, भारतीय अन्नाचा अभाव आणि सतत आजारी पडणं या सगळ्या अडचणी असूनही आनंदीबाईंनी हार मानली नाही. 1886 मध्ये त्यांनी यशस्वीरित्या वैद्यकीय पदवी मिळवली आणि त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या.
1887 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी निधन
भारत परतल्यावर त्यांचं कोल्हापूरच्या रुग्णालयात महिला डॉक्टर म्हणून स्वागत झालं. पण त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. अमेरिकेत शिक्षण घेत असतानाच त्यांना क्षयरोग झाला होता. भारतात परतल्यावर काही महिन्यांतच, 26 फेब्रुवारी 1887 रोजी, अवघ्या 21 व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं.
त्यांचं आयुष्य जरी अल्प होतं, तरी त्यांनी आपल्या धैर्याने, संघर्षाने आणि प्रेरणादायी कार्याने अनंत पिढ्यांना उभारी दिली. आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचं नाव आजही भारताच्या शिक्षण आणि वैद्यकीय इतिहासात आदराने घेतलं जातं.