Western Railway News : पश्चिम रेल्वे कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेने मुंबईवरून दोन नव्या विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे कडून वांद्रे टर्मिनस ते विरंगना लक्ष्मीबाई झांसी रेल्वे स्टेशन आणि वांद्रे टर्मिनस – सुबेदारगंज स्टेशन यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्या विशेष भाड्याने चालवल्या जातील.

महत्त्वाची बाब अशी की या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत म्हणजेच आठवड्यातून एक दिवस चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात या गाड्यांबाबत संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाड्या कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
बांद्रा टर्मिनस ते झाशी विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ट्रेन क्रमांक 02200 ही बांद्रा टर्मिनस ते झासी विशेष एक्सप्रेस ट्रेन पाच जुलै ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान दर शनिवारी बांद्रा टर्मिनस येथून पाच वाजून दहा मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजता ही गाडी झासी येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 02199 म्हणजेच झासी ते बांद्रा टर्मिनस विशेष एक्सप्रेस ट्रेन 3 जुलै ते 25 सप्टेंबर 2025 दरम्यान प्रत्येक गुरुवारी झाशी येथून 16:50 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 16 : 10 वाजता बांद्रा टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार?
ही गाडी या मार्गावरील बोरिवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन, मक्सी, बियावरा राजगड, चाचोरा बिनागंज, रुठियाई, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर, डबरा आणि दतिया या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.
बांद्रा टर्मिनस – सुभेदारगंज विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
रेल्वेच्या प्रसिद्ध पत्रकानुसार गाडी क्रमांक 04126 बांद्रा टर्मिनस – सुबेदारगंज सुपरफास्ट विशेष ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.15 वाजता बांद्रा टर्मिनसहून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5.00 वाजता सुबेदारगंज येथे पोहोचेल. ही विशेष गाडी 8 जुलै 2025 पासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत धावणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 04125 सुबेदारगंज – बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट विशेष ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी 5.20 वाजता सुबेदारगंजहून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता बांद्रा टर्मिनस येथे पोहोचेल. ही विशेष गाडी 7 जुलै 2025 पासून 29 सप्टेंबर 2025 पर्यंत धावणार आहे.
बांद्रा टर्मिनस – सुभेदारगंज विशेष एक्सप्रेस ट्रेन कुठ कुठं थांबणार?
बोरीवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापुर सिटी, बयाना, रुपबास, फतेहपूर सिक्री, इदगाह, तुंडला, इटावा, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.