संकटांमध्ये अडकलेलं आणि तरीही जगभरातील कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेलं एक छोटंसं राष्ट्र आज जगाच्या दयेवर चालतं आहे. व्हॅटिकन सिटी, जगातील सर्वात छोटा आणि सर्वाधिक आध्यात्मिक वजन असलेला देश सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, इतकं की जर देणग्या थांबल्या, तर इथल्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. एकेकाळी धर्माच्या बळावर जगाच्या कोट्यवधी हृदयांवर अधिराज्य करणाऱ्या या देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल.

जगाच्या नकाशावर एखाद्या डोक्यावरच्या ठिपक्यासारखा दिसणारा व्हॅटिकन, फक्त 0.49 चौरस किमी क्षेत्रफळात सामावलेला आहे. इटलीतील रोम शहराच्या कुशीत असलेला आणि 1929 मध्ये स्वतंत्र देशाचा दर्जा मिळवलेला हा देश केवळ 800 नागरिकांचे घर आहे. मात्र, याच देशात पोप राहतात, जे संपूर्ण कॅथोलिक ख्रिश्चन जगताचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत. इथेच सेंट पीटर बॅसिलिका, सिस्टिन चॅपल आणि जगप्रसिद्ध व्हॅटिकन म्युझियम आहे, जिथं जगभरातून लाखो पर्यटक येतात. पण हे आकर्षणही आता देशाला पुरेसं अर्थिक पाठबळ देत नाही.
व्हॅटिकन सिटीमधील स्थिती
सतत लाखो लोकांचं आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या या राष्ट्राची वास्तविकता मात्र फारच वेगळी आहे. व्हॅटिकन सिटीचा संपूर्ण खर्च मुख्यत्वे देणग्या, पर्यटकांच्या संग्रहालय तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न आणि थोड्याफार प्रमाणात असलेली रिअल इस्टेट यांच्या जोरावर चालतो. परंतु गेल्या काही वर्षांत ही सर्व स्रोत कोलमडले आहेत. 2023 मध्ये ‘पीटर पेन्स’ या नावाने घेतल्या जाणाऱ्या देणग्यांमधून फक्त 48.4 दशलक्ष युरो उभे राहिले, त्यातही अमेरिकेचा हिस्सा जवळपास 28% म्हणजे 13.6 दशलक्ष युरो होता. हे प्रमाण 2018 मधील 74 दशलक्ष युरोपेक्षा खूपच कमी आहे.
हे आकडे केवळ आर्थिक संकटाचं चित्र रंगवत नाहीत, तर एका धर्मसंस्थेच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या धडपडीचं उदाहरणही आहेत. कॅनन कायद्यानुसार, जगभरातील बिशप्सना व्हॅटिकनला नियमित देणग्या द्याव्या लागतात. यामध्ये अमेरिकन बिशप्सचं योगदान इतर देशांच्या तुलनेत फार मोठं आहे. 2021 ते 2023 या काळात फक्त अमेरिकेनेच सुमारे 43 दशलक्ष युरोचा निधी दिला आहे. पण दुसऱ्या बाजूला, युरोप आणि इतर खंडांमधील देणग्यांत सातत्याने घट होत आहे.
आर्थिक अडचणीमागील कारणे
या आर्थिक अडचणींमागे अनेक कारणं आहेत. कोविड-19 महामारीने व्हॅटिकन संग्रहालय बंद केली आणि त्यामुळे हजारो युरोंचं रोजचं उत्पन्न थांबलं. त्यातच चर्चमध्ये झालेले लैंगिक शोषणाचे घोटाळे आणि लंडनमधील रिअल इस्टेट विवाद यामुळे कॅथोलिक धर्मातील विश्वासाचेही मोठे नुकसान झाले. परिणामी, देणगीदारांचा विश्वास डळमळीत झाला. चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या युरोप आणि अमेरिकेत झपाट्याने कमी झाली आहे. जर्मनीत सुरू असलेला ‘सिनोडल वे’ वाद आणि ख्रिश्चन कुटुंबांमधील घटती लोकसंख्या हेही परिणामकारक घटक ठरले आहेत.
व्हॅटिकनची ही अवस्था पाहून अमेरिकेच्या पापल फाउंडेशनचे अध्यक्ष वॉर्ड फिट्झगेराल्ड यांनी त्यांना तोट्यात गेलेल्या मालमत्ता विकण्याचा सल्ला दिला. 2022 मध्ये व्हॅटिकनने काही रिअल इस्टेट विकून जवळपास 50.3 दशलक्ष युरो जमा केले. पण ही तात्पुरती सावरण्याची प्रक्रिया आहे. मालमत्ता विकून सरकार चालवणं म्हणजे मूलत: आपला पाया कमकुवत करणं आहे.
सध्या जगाला दिशा देणाऱ्या धार्मिक संस्थेचा हा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे, आणि जर वेळेवर मदत न मिळाली, तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशासोबतच एका विश्वासाचंही संकट ओढवू शकतं.