10 मिनिटांत नखांवरील मेंदीचा रंग निघेल, वापरुन पाहा ‘या’ कमाल घरगुती ट्रिक्स!

Published on -

सण-समारंभ म्हटले की मेंदी हे नाव आलंच. मेंदीच्या नाजूक आणि आकर्षक डिझाईन्स हातांना खास सौंदर्य बहाल करतात. पण कधी कधी हीच मेहंदी नखांवर लागते आणि एक विचित्रसा रंग देऊन जाते गडद नारिंगी, पिवळसर किंवा तपकिरी डाग, जे नखांवर फारसे उठून दिसतात आणि सौंदर्यावर विरजण घालतात. विशेषतः जेव्हा मेहंदीचा रंग नखांवर दीर्घकाळ टिकतो आणि काहीही करून जात नाही, तेव्हा त्रास होतो. पण चिंता नको. काही साधे घरगुती उपाय वापरून तुम्ही हे डाग सहज हलके किंवा पूर्णतः दूर करू शकता.

नारळ तेल

जर तुमच्या नखांवर मेहंदीचा गडद रंग टिकून बसला असेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे नारळ तेल. हे तेल नखांना मऊ करतं आणि रंगही फिका करतं. थोडं कोमट पाणी घेऊन त्यात हात बुडवा आणि नंतर नारळाचं तेल लावून नखे एकमेकांवर सौम्यपणे घासा. ही प्रक्रिया रोज केल्यास हळूहळू फरक जाणवेल.

साखर आणि लिंबू

दुसरा उपाय आहे साखर आणि लिंबू. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. साखर घासण्यामुळे डाग हलके होतात. थोडी साखर आणि लिंबाचा रस मिसळून ते नखांवर लावा, नंतर हळुवार चोळा. जास्त घासू नका, अन्यथा नखांना दुखापत होऊ शकते.

लिंबू आणि बेकिंग सोडा

थोडं अधिक प्रभावी काही हवं असेल, तर लिंबू आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नखांवर लावा आणि 5 मिनिटांत स्क्रब करून धुवा. हा उपाय करताना सावध राहा. फार वेळ ठेवू नका, अन्यथा नखे कोरडी आणि नाजूक होऊ शकतात.

टूथपेस्ट

तुमच्याकडे टूथपेस्ट असेल तर ती देखील कामी येऊ शकते. पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट नखांवर लावून 10 मिनिटांनी घासा आणि धुवा. यामुळे डाग हलके होतात.

टोमॅटोचा रस

अजून एक नैसर्गिक पर्याय म्हणजे टोमॅटोचा रस. त्यात थोडी आम्लता असल्याने मेंदीचा रंग हलकासा कमी होतो. नखांवर रस लावून काही मिनिटांनी सौम्य ब्रशने चोळा.

एक लक्षात ठेवा हे उपाय सतत, वारंवार न करता मधून मधून वापरा. उपाय केल्यानंतर मॉइश्चरायझर किंवा हँड क्रीम वापरणं आवश्यक आहे, कारण वारंवार स्क्रब केल्याने नखे कोरडी पडू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!