Vande Bharat Railway : महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मराठवाडा विभागातील परभणी आणि नांदेड या दोन शहरातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. खरे तर महाराष्ट्रातून सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.
सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर सध्या स्थितीला वंदे भारत ट्रेनचे यशस्वी संचालन सुरू आहे.

महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांना आगामी काळात आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. एकीकडे अशी सगळी परिस्थिती असतानाच आता राज्यातून धावणाऱ्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई जालना वंदे भारत ट्रेन आता थेट नांदेड पर्यंत धावणार आहे. या सेमी हायस्पीड ट्रेन चा मार्ग नांदेड पर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे कडून नुकताच घेण्यात आला आहे.
या नव्या विस्तारामुळे नांदेड, परभणी या दोन शहरातील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. पण याचा छत्रपती संभाजी नगर मधील प्रवाशांना फटका बसू शकतो. यामुळे या विस्ताराचा छत्रपती संभाजी नगर मधील प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
खरंतर, मुंबई – जालना वंदे भारत ट्रेनचा विस्तार केला जाणार आहे पण या विस्ताराच्या उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तथापि, आज आपण या गाडीचा नांदेड पर्यंत विस्तार झाल्यानंतर ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार आणि नवं वेळापत्रक कसे असणार ? याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
मुंबई – नांदेड वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक कसे असणार?
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेड रेल्वे स्थानकावरून पहाटे 5 वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी 5 वाजून 40 मिनिटांनी परभणी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. यानंतर, 07:20 वाजता ही गाडी जालनाला येणार आहे, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ही गाडी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास दाखल होणार आहे आणि मुंबईत ही गाडी दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी येणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तरी ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी रवाना होणार आहे आणि रात्री 10:50 मिनिटांनी ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
नवीन गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण या महत्त्वाच्या स्थानकावर ही वंदे भारत ट्रेन थांबा घेणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. आता आपण या गाडीचे तिकीट दर कसे असणार ? या संदर्भातील माहिती पाहणार आहोत.
कसे असणार तिकीट दर ?
खरे तर सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. तथापि मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की या गाडीचे एसी चेअर कारचे तिकीट अंदाजे 1750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3 हजार 300 रुपये इतके असू शकते.