भाजपमध्ये कोणीही येऊ द्या , पण श्रीगोंद्याच्या उमेदवारीची शिफारस बबनराव पाचपुते यांचीच : खा. डॉ. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात मला चांगले माताधिक्य मिळवून दिले , त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार , असे  खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठासून सांगितले.

पंचायत समितीचे सभापती शहाजी हिरवे यांनी खेतमाळीसवाडी ( पारगाव ) येथे आयोजित केलेल्या माजी मंत्री बबनराव पाचपुते  यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात  खा. डॉ. विखे बोलत होते.

खा. डॉ. विखे पुढे म्हणाले, काल श्रीगोंदा साखर कारखान्यावर गुप्त खलबते झाल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रात आल्यामुळे अनेक लोकांचा संभ्रम झालेला आहे. कोणत्याही प्रकारची खलबते झालेली नाहीत. तालुक्यात मोठी राजकीय उलाढाल होण्याचे संकेत काही प्रसार माध्यमांनी दिलेले आहेत.

ते सर्व चुकीचे आहे. बबनराव पाचपुते सोडून मी विधानसभेसाठी इतर कोणाचीही शिफारस करणार नाही , कारण इतरांनी  माझे लोकसभेचे काम तर केलेच नाही उलट  विरोधी उमेदवाराचे  काम केलेले आहे.

विधानसभा झाल्यावर बबनराव पाचपुते यांच्या सत्काराच्या निमित्ताने श्रीगोंदे तालुक्यातील प्रत्येक गावात मी येणार आहे. कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत सर्व पाणीवाटप संस्थेच्या चेअरमन यांची बैठक घेऊन कोणत्या चारीला किती तारखेला आणि किती क्युसेक्सनी पाणी येणार याच्या नियोजनाची प्रत त्यांना व कार्यकर्त्यांना देऊ. कुकडीचे पाणी श्रीगोंदे तालुक्याला सोडण्याबाबत मी पाटबंधारे  खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उद्याच चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

तालुक्याला हुशार माणूसच नको

खा. डॉ. सुजय विखे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, प्रा. तुकाराम दरेकर हे तुमच्या तालुक्यात  अभ्यासू आहेत. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे मी ऐकली आहेत. पण श्रीगोंदा तालुका असा आहेकी, त्यांना हुशार माणूसच नको आहे. मी जाहीरपणे सांगतो की , मुख्यमंत्र्यांना सांगून प्रा. दरेकर यांना राज्य पातळीवर एखाद्या अभ्यास मंडळावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देईन.

आण्णासाहेब शेलार यांनी आज बेलवंडी येथे बबनराव पाचपुते यांना केक भरविला आणि पाचपुते यांनीही त्यांना केक भरविला मला खात्री आहे आण्णासाहेब शेलार हे पाचपुते यांचा केक गोड करून घेतील व  शेलारांची  जबाबदारी माझ्याकडे राहील.

यावेळी केक कापून बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब महाडिक. संदीप नागवडे, सभापती शहाजी हिरवे, सुभाष डांगे, दिनकर पंधरकर, रमेश गिरमकर, बाबासाहेब सरोदे, संपत दरेकर, भीमराव लांडगे, संतोष दरेकर व  पारगाव येथील भाजपचे अनेक कार्यकर्ते  उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment