भावी नवरदेवांनो ! Ahilyanagar जिल्ह्यातील ‘या’ भागात लग्न जमवून देणारी टोळी सक्रिय, आत्तापर्यंत अनेक तरूणांना घातलाय लाखोंचा गंडा

Published on -

Ahilyanagar News : विवाहासाठी मुली मिळत नाहीत, याचा गैरफायदा घेऊन एका टोळीने पाथर्डी तालुक्यात अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. फसविले गेलेले लोक चितळवाडी, भापकरवाडी व माणिकदौंडीच्या डोंगराळ भागातील आहेत. विवाह जुळवणारा एकजण पोलिसांनी चितळवाडी येथून ताब्यात घेतला होता. बुधवारी दिवसभर त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. विवाह लावला, पण मुली पळून गेलेल्या दोन घटनेतील अर्धे पैसे परत देण्याच्या तडजोड झाली.

आम्हाला काही तक्रार द्यायची नाही, असे लेखी दिल्याने पोलिसांनी एंजटला सोडून दिले. टोळीचा पर्दाफाश केल्यास अनेकांची झालेली आर्थिक पिळवणूक थांबली जाईल. चितळवाडी येथील एक व भापकरवाडी येथील एक अशा दोन युवकांना विवाहासाठी मुलगी पाहून देण्याचे काम रांजणी फाट्यावर राहणाऱ्या एका एंजटने केले. दोघांकडून सुमारे तीन-तीन असे सहा लाख रुपये घेतले.विवाह झाला, एका दिवसातच मुली पळून गेल्या. नंतर समजले की मुली व त्यांचे आई-वडील बनावट होते. एंजटच्या सोबत काही महिलादेखील सहभागी आहेत. याच एजंटने अनेक सोईरीकी पैसे घेऊन जमविलेल्या आहेत.

विवाह झाल्यानंतर चार दिवस, आठवडा व काही एक महिना तर काही दोन महिने राहून मुली पसार होतात.शिवाय त्या जाताना दागिने घेऊन जातात. मुलीच मिळत नसल्याने नागरिक लाखो रुपये देण्यास सहज तयार होतात. भापकरवाडीच्या युवकाचे वडील जर्जर झालेले आहेत. त्याचा हा दुसरा विवाह होता. त्यांनी तीन लाख देऊन दागिनेदेखील केले होते. मुलगी दुसऱ्या दिवशीच पळून गेली.आता एजंटला पोलिसांनी चितळवाडीतून मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होते. एंजटनेच पोलिसांना फोन करून माझे अपहरण केले आहे. मला वाचवा, असे सांगितले. पोलिसांनी एक एजंट व चितळवाडीतील एका माणसाला आणून पोलिस ठाण्यात बसविले होते.

बुधवारी एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने दोन फसवणूक झालेल्या युवकांना प्रत्येकी दीड लाख रुपये देण्याचे ठरले आहे. एंजट व फसवणूक झालेले यांच्यात समेट झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. चितळवाडीतील आणखी एक फसविलेला युवक आहे. त्याचे वडील पंढरपूरला वारीला गेल्याने तो पोलिसांत आला नाही. त्याने फोन करून मला फसविले असल्याचे सांगितले. सायंकाळी पोलिसांनी दोन्ही युवकांकडून आमची काही तक्रार नाही, असे लिहून घेतले व एंजटला सोडून देण्यात आले.

कोणाचीही तक्रार नाही म्हणून एजंटवर कारवाई झाली नाही. मात्र, हा एंजट पुन्हा विवाह लावून देतो म्हणून अनेकांची फसवणूक केल्याशिवाय राहणार नाही. कारण एका आठवड्यात एक विवाह लावला तरी लाखो रुपये भेटतात. त्यापैकी अनेकजण इज्जतीचा पंचनामा नको म्हणून फसवणूक होऊनही पोलिसांत येत नाहीत. झाकली मूठ सव्वालाखाची ठेवली जाते. विवाह जमत नाहीत म्हणून त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!