कोपरगाव- शहरातील तब्बल ६४ इमारती व घरे धोकादायक बनल्या आहेत. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या वतीने चार जणांच्या पथकाने केलेल्या सर्वे मधून ही माहिती समोर आली आहे. या ६४ जणांना पालिका प्रशासनाने नुकत्याच नोटीसा बजावल्या आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संबंधित इमारतींमुळे दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या ६४ मालकांना नोटीसा बजावल्या आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती, घरे गावठाण भागात आहे.

त्या इमारती धोकादायक आहे. इतरही इमारतींना धोका पोहोचून जीवितहानी होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहे. धोकादायक इमारती उतरवून घ्याव्यात, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या जात आहे. शहर परिसरात अनेक वर्षांपूर्वीचे वृक्ष असल्याने यापूर्वी झाड कोसळून अपघात झाले आहे. त्यातील अनेक वृक्ष आता धोकादायक बनले आहे.
पावसाळ्यात कधीही हे वृक्ष कोसळून अपघात होऊ शकतात. शहरात अनेक धोकादायक इमारती आहे. सर्व इमारत मालक आणि त्यातील कुळांना त्याबाबत कळविले आहे. काही इमारतींबाबत न्यायालयीन दावे सुरू आहे.
अत्यंत धोकादायक इमारतीच्या मालकांना अंतिम नोटीसा बजावल्या आहेत. धोकादायक शक्य तितक्या इमारती उतरून घेण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार शहरातील तमाम जीर्ण व पडावू तसेच ३० ते ४० वर्षावरील इमारत धारक, जागा मालक, भोगवटाधारक आहेत.
नदीकाठावरील व नाल्याचे काठावरील अनाधिकृत अतिक्रमित झोपड्या, घरे, बांधकामे इतरत्र हलविण्याची व्यवस्था करुन जिवित अगर वित्तिय हानी होणार नाही. याची दक्षता घ्यावी. पालिका जबाबदार राहणार नाही. पावसाळ्यात पूर येवून आपली घरांचे आर्थिक नुकसान व जिवितहानी झाल्यास त्यास नगरपरिषद अथवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नसल्याचे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहे.