अहिल्यानगर- ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे. मे महिन्यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी सुखावल्याचे पाहायला मिळाले. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर बहुतेक ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला. जमिनीची ओल पाहून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर काही ठिकाणी अपवाद वगळता अनेक ठिकाणी अल्प प्रमाणात पाऊस झाला असल्याने पेरणी केलेली पिके हातची जातात की काय? असा प्रश्न शेतकरी वर्गातून चर्चिला जात आहे.
चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी उधार उसनवारी करून पिके उभी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना हातचे पीक वाया जाणार का? या चिंतेने ग्रासले आहे. सोयाबीन, मका, कापूस ही नगदी पिके शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन जातात. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आभाळाकडे नजरा लावून बसलेल्या या बळीराजाचे बळच गायब झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना पाऊस लांबल्याने फार मोठा फटका बसतो. उगवण झालेल्या पिकांना पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा विजेच्या लपंडवामुळे पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच पाऊस कमी झाल्यास पिकांच्यावाढीवर आणि पर्यायाने उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले जाते. त्यामुळे पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसतोच. भविष्यातील नियोजनही कोलमडले जाते. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे.