भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच एक शक्तिशाली यंत्र सामील होणार आहे, ते म्हणजे अपाचे AH-64E लढाऊ हेलिकॉप्टर. हे हेलिकॉप्टर केवळ धाडसी मोहिमांसाठीच नाही, तर सीमारेषेवरील प्रत्यक्ष धोका असल्यास, शत्रूला प्रत्युत्तर देण्याची सर्वोत्तम क्षमता असलेलं शस्त्र आहे. अमेरिका निर्मित हे अपाचे हेलिकॉप्टर जागतिक पातळीवर सर्वात धोकादायक हल्लेखोर म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, आता ही शक्ती भारताच्या सैन्याच्या हातात येणार आहे आणि ती थेट पाकिस्तान सीमेवर तैनात केली जाणार आहे.

अपाचे AH-64E लढाऊ हेलिकॉप्टर
वर्ष 2020 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात 600 दशलक्ष डॉलर्सचा करार झाला होता, ज्याअंतर्गत भारतीय लष्करासाठी 6 अपाचे हेलिकॉप्टर मिळवण्याचे ठरले होते. यापूर्वी भारतीय हवाई दलाकडे 22 अपाचे हेलिकॉप्टर होतीच, पण लष्करासाठी ही पहिलीच तुकडी असणार आहे. गेल्या वर्षभरात काही कारणांमुळे डिलिव्हरी उशिराने झाली, पण आता ती वेळ जवळ आली आहे. जोधपूरमध्ये भारतीय लष्कराने मार्च 2024 मध्ये आपले पहिले अपाचे स्क्वाड्रन तयार केले, आणि जुलैमध्ये त्यांना तीन अपाचे मिळणार आहेत. उर्वरित तीन हेलिकॉप्टर वर्षअखेरीस भारतात दाखल होणार आहेत.
या अपाचे हेलिकॉप्टरचं सामर्थ्य हे केवळ गोळीबारात नाही, तर त्यामागच्या अचूकतेत आणि तंत्रज्ञानात दडलेलं आहे. 30 मिमी M230 चेन गन हे यंत्र एकाच मिनिटात सुमारे 625 राउंड फायर करू शकतं. त्यात हेलफायर क्षेपणास्त्रं आणि हायड्रा रॉकेट्स लावलेले असून, ते बंकर, टँक, बख्तरबंद वाहने आणि इतर ध्येय अचूकपणे उद्ध्वस्त करू शकतात. त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व काही ते रात्रीही करू शकतं कारण त्यात थर्मल इमेजिंग आणि नाईट व्हिजन टेक्नॉलॉजी आहे.
वेग आणि वैशिष्ट्ये
अपाचेंचा वेग तब्बल 300 किमी/तास इतका आहे, त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस किंवा तातडीच्या मोहिमांमध्ये ते झपाट्याने प्रतिसाद देऊ शकते. त्याचं कॉकपिट बुलेटप्रूफ असून, इतर भागांनाही बख्तरबंद संरक्षक कवच देण्यात आले आहे. तसेच, शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्व-संरक्षण प्रणाली देखील यामध्ये आहे.
त्याच्या लॉन्गबो रडार सिस्टममुळे हे हेलिकॉप्टर एकाचवेळी 360 डिग्रीमध्ये शत्रूंचा मागोवा घेऊ शकतं. त्याची माहिती रिअल-टाइममध्ये कमांड सेंटरला पोहोचते, ज्यामुळे लढाईच्या मैदानावर नेमकी योजना तयार करता येते. महत्वाचं म्हणजे, या अपाचेमध्ये शस्त्र प्रणाली गरजेनुसार बदलता येतात. ही लवचिकता भारतासारख्या विविध सीमाभागांमध्ये लढणाऱ्या लष्करासाठी फारच उपयुक्त ठरते.