Pune Metro News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुण्यातील मेट्रो संदर्भात. खरंतर, सध्या स्थितीला पुणे शहरात दोन मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरु आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग महामेट्रो कडून सुरु करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देखील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान नवा मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागाला आयटी हब म्हणून प्रख्यात असणाऱ्या हिंजवडी सोबत कनेक्ट करण्यासाठी या नव्या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या मेट्रो मार्ग 3 च्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
काय आहे नवीन अपडेट ?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्प हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर विकसित केला जात आहे.
या प्रकल्पाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा पुण्यातील पहिलाच पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प आहे. दरम्यान या मेट्रो मार्ग प्रकल्पाचे आतापर्यंत 87% इतके काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण व्हावे या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.
तसेच या मेट्रो मार्गावर आता ट्रायल रन देखील सुरू करण्यात आली आहे. या 23.3 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावरील मान डेपो आणि विप्रो सर्कल यादरम्यान ट्रायल रन सुरू करण्यात आली आहे. यामुळे येत्या काही महिन्यांनी या मेट्रो मार्गावर कमर्शियल ऑपरेशन सुरू होतील अशी आशा आहे.
या मार्गाचे जवळजवळ 87% काम पूर्ण झाले आहे आणि म्हणूनच मार्च 2026 पर्यंत हा मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर, पुण्यातील एकूण कार्यरत मेट्रोची लांबी 56 किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे.
हिंजवडी येथील आयटी कंपन्यांमध्ये कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या तिसऱ्या मेट्रो मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.