DA Hike 2025 : सध्या संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरु आहे, मात्र सध्याचा सातवा वेतन आयोग जाता-जाता सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करून जाणार आहे. खरे तर केंद्रातील मोदी सरकार सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता पुन्हा वाढवणार आहे. ही महागाई भत्ता वाढ सातवा वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे.
महत्वाची बाब अशी की, ही शेवटची महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढवणार आहे. जसं की आपणास माहीतच आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो. एकदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जातो.

दरम्यान मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासूनचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला असून याचा अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्यात निघाला आणि मार्च महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला,
पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, आता सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आहे आणि आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार?
जुलै 2025 पासूनची महागाई भत्ता वाढ ही सातव्या वेतन आयोगाची शेवटची महागाई भत्ता वाढत ठरणार आहे. कारण की एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी अपेक्षित आहे. यामुळे सातवा वेतन आयोगातील ही शेवटची महागाई भत्ता वाढ कशी असणार, यावेळी महागाई भत्ता किती वाढणार? असे असंख्य प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्स मध्ये यावेळी म्हणजेच जुलैपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% ने नाही तर तब्बल चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जात असते.
ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स (AICPI-IW) च्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरत असतो. म्हणजेच जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार हे क्लिअर होणार आहे.
दरम्यान आतापर्यंत एआयसीपीआयची जानेवारी ते मे या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे आणि लवकरच जून महिन्यांची आकडेवारी सुद्धा जाहीर होणार आहे. याच एआयसीपीआयची गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहिली असता मार्च महिन्यात एआयसीपीआयचे निर्देशांक 143 वर होते, एप्रिलमध्ये हे निर्देशांक 143.5 वर पोहोचलेत आणि मे महिन्यात हे निर्देशांक 144 वर पोहोचले आहेत.
अजून जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे. पण, जर समजा जून महिन्यात असाच वाढीचा ट्रेंड कायम राहिला आणि हे निर्देशांक 144.5 वर पोहोचले तर महागाई भत्त्याचा दर 58.85 वर जाण्याची शक्यता आहे आणि अशा तऱ्हेने जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढेल असे बोलले जात आहे.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता दिला जातो ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू आहे आणि जर यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर हा महागाई भत्ता 59 टक्क्यांवर पोहोचणार आहे आणि ही वाढ जुलै 2025 पासून लागू होणार आहे.
अधिकृत शासन निर्णय कधी निघणार
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असली तरी देखील याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा ऑगस्ट किंवा सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
अर्थातच केंद्रातील सरकारकडून दसरा किंवा दिवाळीच्या सुमारास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जेव्हा याबाबतचा शासन निर्णय जारी होईल तेव्हा त्या महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळेल.