Maharashtra News : आज सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यभरात आज अगदीच उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आषाढी सोहळ्याच्या आधीच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी अर्थातच 04 जुलै 2025 रोजी राज्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. यामुळे शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढताना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून याच पावसाळी अधिवेशनात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे जाहीर केले आहे की, आता सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
ह्या कागदपत्रांसाठी सुद्धा मुद्रांक शुल्क लागणार नाही
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना जातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर देण्याची गरज भासणार नाही.
आता केवळ स्वसाक्षांकित साध्या कागदावर अर्ज करून सुद्धा हे दाखले मिळवता येणार आहेत. आत्तापर्यंत हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर देणे अनिवार्य होते. खरे तर महायुती सरकारने मुद्रांक शुल्क 100 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा तुगलकी निर्णय घेतला होता.
या निर्णयाचा विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका सुद्धा बसला. यामुळे महायुती सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये मोठी संतापाची लाट पाहायाला मिळाली. महसूल वाढीसाठी राज्य शासनाकडून गरीब विद्यार्थ्यांना लुटले जात आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी संतापाची लाट पाहता आता राज्य शासनाने मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे आणि याचा सर्वच विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.
खरे तर दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांसाठी धावपळ करताना दिसतात. दरम्यान दहावी, बारावीच्या निकालानंतर प्रमाणपत्रांसाठी होणारी धांदल लक्षात घेता, सरकारने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यामुळे पालकांचाही खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की मुद्रांक शुल्क माफीचा हा निर्णय लवकरात लवकर अमलात आणला जाणार आहे. महसूलमंत्र्यांनी हा निर्णय येत्या काही दिवसांनी अमलात येईल असे विधानसभेतून जाहीर केले आहे.