Maharashtra New Expressway : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची झळ बसली. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत आणि याच निर्णयांमध्ये सर्वात मोठा निर्णय होता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय. तत्कालीन शिंदे सरकारने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्यात येईल असे जाहीर केले होते.
मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीने सत्ता काबीज केली आणि महायुती सरकारचा सूर पुन्हा बदलला आहे आणि आता सरकारने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी सुद्धा दिली आहे. दरम्यान याच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या बाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग म्हणजेच वर्धा जिल्ह्यातील पवनार ते पत्रा देवी दरम्यान उभारण्यात येत असलेल्या शक्तीपीठ एक्सप्रेसवेला राज्यातील इतर प्रमुख एक्सप्रेसवे मार्गांशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेला शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना एकत्रित करणार असे बोलले जात आहे.
शक्तीपीठ एक्सप्रेस वे ला हे 3 महामार्ग प्रकल्प जोडले जाणार
मिळालेल्या माहितीनुसार शक्तिपीठ एक्सप्रेसवेला जालना-नांदेड एक्सप्रेसवे जोडला जाणार आहे, जालना नांदेड एक्सप्रेस वे परभणीजवळ शक्तीपीठ एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे. तसेच सूरत-चेन्नई एक्सप्रेसवे तुळजापूरजवळ शक्तीपीठ महामार्गासोबत जोडला जाणार आहे.
शिवाय, पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे हा तासगावजवळ शक्तीपीठ महामार्गासोबत जोडला जाणार आहे. नक्कीच यामुळे मराठवाडा, विदर्भ सहित मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील नागरिकांना फायदा होणार आहे.
कसा असणार रूट ?
वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी यादरम्यान तयार केला जाणारा शक्तिपीठ महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा महामार्ग राज्यातील तीन महत्त्वाच्या शक्तीपीठांना कनेक्टिव्हिटी देणार आहे. माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे शक्तिपीठ या महामार्गामुळे कनेक्ट होणार आहेत.
यासोबतच राज्यातील इतर महत्त्वाची तीर्थक्षेत्र सुद्धा या मार्गामुळे कनेक्ट होणार आहेत. हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे.