Maharashtra Expressway : राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाचा धर्तीवर विकसित केला जाणारा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर ते गोवा दरम्यान हा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे.
या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे कारण हा महामार्ग प्रकल्प राज्यातील तीन शक्तीपीठांना कनेक्ट करतो. दरम्यान याच 802 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

खरंतर, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली होती.
पण विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुती सरकारचा सुरू बदलला आहे आणि आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनास मंजुरी सुद्धा बहाल करण्यात आली आहे.
दरम्यान या महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनास मंजुरी मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. ही मोजणी प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरू झाली आहे.
गेल्या महिन्याच्या म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या महामार्ग प्रकल्पासाठी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण, मोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, घाटनांद्रे या गावांमध्ये मोजणीवेळी शेतकऱ्यांनी जोरदार विरोध सुद्धा दर्शविला.
असे असतानाही आता आजपासून अर्थातच 7 जुलै 2025 पासून जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गावांमध्ये मोजणीस प्रारंभ होणार आहे. दरम्यान आता आपण तालुक्यातील कोणत्या गावांमध्ये कोणत्या दिवशी जमीन मोजणीची प्रक्रिया पाडली जाणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
तासगाव तालुक्यातील जमीन मोजणी प्रक्रिया कशी असणार
सात जुलै 2025 रोजी डोंगरसोनी या गावात मोजणी केली जाणार आहे.
आठ जुलै रोजी सिद्धेवाडी या गावात मोजणी केली जाणार आहे.
9 जुलै रोजी सावळज या गावात मोजणी केली जाणार आहे.
11 जुलै रोजी अंजनी या गावात मोजणी केली जाणार आहे.
14 जुलै रोजी गव्हाण या गावात मोजणी केली जाणार आहे.
15 जुलै रोजी वज्रचौन्डे / सावर्डे या गावात मोजणी केली जाणार आहे.
16 जुलै रोजी मनेराजुरी या गावात मोजणी केली जाणार आहे.
21 जुलै रोजी मतकुणकी या गावात मोजणी केली जाणार आहे.
22 जुलै रोजी नागाव कवठे या गावात मोजणी केली जाणार आहे.
तासगाव तालुक्यात किती जमीन संपादित होणार?
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या 10 गावांतील 3,877 शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे. या संबंधित शेतकऱ्यांच्या 553 गटातील 373.135 हेक्टर जमीन संपादित केली जाणार अशी माहिती प्राधिकरणाकडून समोर आली आहे. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच बागायती शेती जाणार असल्याच्या कारणावरून या प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी जर आमची शेती जाऊन रस्ता मिळणार असेल, तर तो रस्ता उपयोगाचा नाही अशी भूमिका घेत या महामार्ग प्रकल्पाला प्रचंड विरोध दाखवला आहे.