Pune – Sambhajinagar Expressway : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने 2019 साली एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली.
सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने, या मार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने नवीन महामार्ग विकसित करण्याची घोषणा झाली.

पण आता या महामार्गाची घोषणा होऊन जवळपास चार वर्षे उलटली आहेत आणि प्रत्यक्षात अजूनही या महामार्ग प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झालेली नाही. यामुळे हा महामार्ग प्रकल्प नेमका कुठे अडकला आहे ? या महामार्गाची गरज काय याच संदर्भातील माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
वाहतुकीचा वेळ तीन तासांवर येणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे–छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे अहिल्यानगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे पुणे, नगर आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्यांमधील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना चालना मिळणार आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र चार वर्षे उलटल्यानंतरही या महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. खरतर सध्या स्थितीला पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना सहा तासांचा वेळ लागतोय.
पण नवीन पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग विकसित झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी तीन तासांवर येण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यटन, कृषी, स्थानिक उद्योग आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा आशावाद व्यक्त होतोय. नव्या महामार्गामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, कारण की सध्याच्या महामार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
नव्या मार्गामुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर सारख्या ठिकाणी नवीन उद्योगधंदे, लॉजिस्टिक हब्स विकसित होतील आणि यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. छत्रपती संभाजी नगर मधील वेरूळ अजिंठा, दौलताबाद तसेच पुणे आणि नगर मधील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासाला यामुळे नवीन चालना मिळणार आहे.
प्रकल्प रखडण्याची कारणे
मात्र हा प्रकल्प रखडल्याची कारणे गंभीर आहेत. या प्रकल्पाची फक्त घोषणा करण्यात आली आहे अजून या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आलेला नाही. तसेच जमिनीचे अधिग्रहण, व भूमापन यावर ठोस काम झालेले नाही. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारांमधील समन्वयाचा सुद्धा अभाव असल्याचे दिसून आले आहे.
या प्रकल्पासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांचा जमिनीबाबतचा विरोध यामुळे हा प्रकल्प अनिश्चिततेत सापडला आहे. दरम्यान, हा प्रकल्प औद्योगिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार असल्याने या महामार्गासाठी स्थानिक जनतेसह उद्योजक, शेतकरी यांच्याकडून सातत्याने मागणी होत आहे.
घोषणांवरून पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेषतः अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी या ग्रीनफिल्ड प्रकल्पाला तात्काळ गती देणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.