Pune – Nashik Railway : पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नवीन डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. खरंतर हा मार्ग संगमनेर व्हाया प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र या आधीच्या प्रस्तावित मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प म्हणजेच जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप हा जागतिक दुर्बिण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत होता.
हा एक अतिसंवेदनशील प्रकल्प आहे यामुळे या जवळून रेल्वे मार्ग तयार करणे चुकीचे असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आणि त्यानुसार या मार्गासाठी नवीन डीपीआर तयार करावा अशा सूचना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार आता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी नवीन डीपीआर तयार केला आहे.

कसा आहे नवा DPR?
या रेल्वे मार्गाच्या नव्या डीपीआर बाबत बोलायचं झालं तर यानुसार हा मार्ग पुणे – अहिल्यानगर – शिर्डी – नाशिक असा राहणार आहे. या नव्या रेल्वे लाईनची एकूण लांबी 235 किलोमीटर इतकी राहणार आहे. ही रेल्वे लाईन पुणे ते अहिल्यानगर दरम्यान सध्याच्या पुणे – अहिल्यानगर महामार्गाला समांतर राहणार आहे.
हे पुणे ते अहिल्यानगर अंतर 125 किलोमीटरचे राहणार आहे. तसेच शिर्डी ते नाशिक यादरम्यानच्या रेल्वे लाईनसाठी नवा रूट निश्चित होणार आहे आणि हे अंतर एकूण 82 किलोमीटरचे राहील.
आधीच्या संगमनेर मार्गे प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे लाईनच्या तुलनेत नव्या डीपीआर मधील रेल्वे लाईन मुळे प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी वाढणार आहे. मात्र या नव्या रेल्वे लाईन मध्ये कोणत्याच प्रकल्पाचा अडथळा राहणार नाही.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेने पुणे – नाशिक रेल्वे मार्गासाठी नवीन डीपीआर तयार केला असून हा डीपीआर आता कागदपत्रांमधील काही त्रुटी दूर करून मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे.
किती खर्च होणार ?
पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या 235 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर एकूण 24 स्थानके विकसित होणार आहेत यातील 13 स्थानके मोठे राहतील आणि 11 स्थानके लहान राहतील.
महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षांमध्ये याचे काम पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. म्हणजेच लवकरच पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार आहे. हा रेल्वे मार्ग अहिल्यानगर मधून जाणार असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला देखील यामुळे चालना मिळणार आहे.