Property Rights : आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना पुरुषांच्या आधी स्थान दिले जाते. देवी देवतांचे नाव घेतांना सुद्धा आधी देवीचे नाव आणि मग देवाचे नाव घेतले जाते. जसे की, सीता – राम, राधा – कृष्ण इत्यादी. म्हणूनच घरात मुलीने जन्म घेतला तर लक्ष्मी जन्माला आली म्हणून सगळेजण आनंद साजरा करतात.
पण जेव्हा याच घरातील लक्ष्मीला तिचा संपत्ती मधील हक्क देण्याचा विषय निघतो तेव्हा सर्वजण तिला तिचा हक्क देण्यास उत्सुक नसतात. मुलींना संपत्तीत नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते, कधी कधी तर तिला संपत्तीमध्ये हक्कच दिला जात नाही. मात्र भारतीय कायद्यात मुलांना आणि मुलींना समान अधिकार देण्यात आले आहेत.

वडिलांच्या संपत्तीत जेवढा अधिकार मुलांचा असतो तेवढाच अधिकार मुलींचा सुद्धा असतो, मात्र हे 100% सत्य असले तरी देखील भारतीय कायद्यात असेही नमूद आहे की काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळू शकत नाही आणि अशा प्रकरणांमध्ये स्वतः माननीय सुप्रीम कोर्ट सुद्धा मुलींच्या मदतीला येऊ शकत नाही.
दरम्यान आज आपण मुलींना कोणत्या प्रकरणांमध्ये आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना समान अधिकार
2005 पासून भारतीय महिलांना खऱ्या अर्थाने मुलांप्रमाणेच संपत्तीमध्ये खरे अधिकार मिळू लागलेत. 2005 च्या आधी विवाहित मुलींना आपल्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार मिळत नव्हता.
मात्र 2005 मध्ये संपत्तीच्या कायद्यामध्ये म्हणजे हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली, यात मोठी दुरुस्ती झाली आणि या दुरुस्तीनंतर अविवाहित मुलींप्रमाणेच विवाहित मुलींना देखील वडिलांच्या वडील वारजे तसेच वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीत समान अधिकार मिळू लागला.
सध्या मुलांना आणि मुलींना (मग ती मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित) समान अधिकार दिले जात आहेत. मुलींना आता वडिलोपार्जित मालमत्तेप्रमाणेच वडिलांच्या स्वकष्टार्जित संपत्ती मध्ये देखील मुलांप्रमाणे समान अधिकार मिळतो.
अशा प्रकरणांमध्ये मुलींना हक्क मिळत नाही
पण जर वडिलांनी मृत्यूआधी इच्छापत्र म्हणजेच मृत्युपत्र केले असेल आणि त्यात त्यांनी मृत्यूनंतर मालमत्तेवर फक्त मुलांचाच अधिकार असेल असे जर स्पष्ट केले असेल तर अशा प्रकरणात मुलींना वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही. मात्र, हे फक्त वडिलांनी स्वतःच्या पैशांनी कमावलेल्या संपत्तीसाठीच लागू राहणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीत हे लागू राहणार नाही.
एकंदरीत वडिलांना स्वतःच्या पैशांनी कमावलेल्या संपत्तीचे मृत्युपत्र तयार करून त्यांच्या इच्छेनुसार विभाजन करण्याचा अधिकार आहे. जर समजा मृत्युपत्रात वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेवर (स्वकष्टार्जित) फक्त मुलांचाच अधिकार असेल असं नमूद केलं असेल तर मुली त्याला आव्हान देऊ शकत नाहीत.