अहिल्यानगर ते पुणे प्रवास होणार वेगवान ! ‘या’ रेल्वे मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूट?

पुणे ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास आता लवकरच सुपरफास्ट होणार आहे.

Published on -

Vande Bharat Railway : अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच या दोन्ही शहरादरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान होणार आहे, कारण की कमाल 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता लवकरच राज्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर सुरू केली जाणार आहे.

खरतर, सध्या राज्यात 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत आणि लवकरच राज्याला आणखी चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. या चारही गाड्या सांस्कृतिक राजधानी पुणे रेल्वे स्थानकावरून चालवल्या जाणार आहेत. सध्या पुण्यातून दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू असून आता पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव आणि पुणे ते वडोदरा या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाईल अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

दरम्यान या चारपैकी पुणे ते शेगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. या गाडीला अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला जाणार आहे आणि यामुळे पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास फारच सुपरफास्ट होईल अशी अशा प्रवाशांना आहे. दरम्यान आता आपण या चारही गाड्यांचे रूट पाहणार आहोत. 

पुणे – वडोदरा वंदे भारत एक्सप्रेसचा रूट कसा असेल ?

सध्या पुणे ते वडोदरा या रेल्वे मार्गावर ज्या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत त्यांना या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 9 तासांचा वेळ लागतो. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी सहा ते सात तासांवर येणार आहे.

या गाडीच्या रूट बाबत बोलायचं झालं तर ही गाडी लोणावळा पनवेल आणि वापी मार्गे वडोदराच्या दिशेने रवाना होणार आहे. या गाडीला लोणावळा, पनवेल, वापी सुरत या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.

पुणे – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक कसे असणार 

पुणे आणि तेलंगणाची राजधानी सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन दौंड, सोलापूर आणि गुलबर्गा सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबू शकते असाही दावा करण्यात आला आहे. 

पुणे- बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस 

पुणे – बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावरील सातारा, सांगली, मिरज यांसारख्या रेल्वे स्थानकावर थांबा घेण्याची शक्यता आहे. ही ट्रेन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे. या गाडीच्या तिकिटाबाबत बोलायचं झालं तर पंधराशे ते दोन हजार रुपये इतके तिकीट असू शकते.

पुणे – शेगाव वंदे भारत एक्सप्रेस

पुण्यावरून शेगाव ला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. श्रीक्षेत्र शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यातील भाविक नेहमीच आतुर असतात. हेच कारण आहे की रेल्वे कडून आता पुणे ते शेगाव या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी अहिल्यानगर मार्गे चालवली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही गाडी दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!